राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर ! – आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले असल्याचे प्रतिपादन !
मुंबई – राज्यात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप प्रथम, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्या क्रमांकावर दिसून येत आहे; मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर गेली आहे. आता तरी शिवसेनेने डोळे उघडावेत. एकनाथ शिंदे यांचे बंड किती योग्य होते, हे स्पष्ट झाले, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी १९ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आपण मंत्री असतांना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी १०० कोटी रुपयांचा निधी पळवला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे त्याची नोंद घेण्यात यावी. आदित्य ठाकरे यांच्याविषयी नक्कीच त्यांना अधिक माहिती असेल. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून याच्या चौकशीला सामोरे जावे.
गणेशोत्सवाच्या काळात भाजपच्या वतीने मुंबई येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १ सहस्र २६ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. यापैकी ६७ मंडळांना अंतिम सूचीत स्थान देण्यात आले असून त्यापैकी २१ मंडळांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. हा पारितोषिक वितरण सोहळा २० सप्टेंबर या दिवशी येथील शिवाजी मंदिर येथे होणार आहे. ‘या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत’, असे शेलार यांनी सांगितले.