आवक घटल्यामुळे मुंबईत भाज्यांचे दर दुपटीहून अधिक वाढले !

मुंबई – राज्यात मागील आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे मुंबईमधील भाज्यांची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. भाज्यांचे दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे.

यापूर्वी २६ रुपये किलो असलेली भेंडी ४० रुपये किलो, २४ रुपये किलो असलेले टॉमेटो २० रुपये, २६ रुपये किलो फ्लॉवर ६० रुपये, ढोबळी मिरचीचा दर ४० रुपयांवरून ९० रुपये, गवार ३० रुपयांवरून ६० रुपये, कोथिंबीर जुडी २५ रुपयांवरून ६० ते ७० रुपये, पालक २० रुपयांवरून ५० रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर वाढले आहेत. मुंबईमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरातमधूनही भाज्या येतात. पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने सध्या नाशिक, पुणे आणि गुजरात येथून येणार्‍या भाज्यांचे प्रमाण घटले आहे. पावसाचे प्रमाण अल्प होईपर्यंत भाज्यांचे दर अधिक रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.