पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी २० धरणे काठोकाठ भरली !
पुणे – जिल्ह्यातील २६ धरणांपैकी २० धरणे काठोकाठ भरली असून अन्य ५ धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक आहे, तर माणिकडोह हे धरण २० टक्के रिकामे आहे . पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून २००.५९ टी.एम्.सी. पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एकूण पाणीसाठ्यात १२.१३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उजनी धरणाच्या भिंतीची उंची फ्लॅगच्या (भिंतीची तात्पुरती उंची वाढवण्यासाठी दिलेला जोड) माध्यमातून वाढवल्याने धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या क्षमतेत ६.६८० टी.एम्.सी.ने वाढ झाली आहे.