उल्हासनगर येथे इमारतीचा सज्जा कोसळून एकाचा मृत्यू, तर १ जण गंभीर घायाळ !

धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून नागरिकांचे वास्तव्य !

उल्हासनगर येथे इमारतीचा सज्जा कोसळून एकाचा मृत्यू

ठाणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) – मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असलेल्या उल्हासनगर येथे इमारतीचे सज्जे कोसळत आहेत. उल्हासनगर कॅम्प क्र. ३ मधील २२ सेक्शनमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेत गोपाळदास गाबरा (वय ६३ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी बरखा गाबरा (वय ६० वर्षे) या गंभीररित्या घायाळ झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मागील १० वर्षांत ३४ इमारतींचे सज्जे कोसळून ४० हून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत, तर सहस्रो नागरिक बेघर झाले आहेत.

१. उल्हासनगर शहरात वर्ष १९९२ ते १९९५ या काळात रेतीवर बंदी असतांना दगडाचा बारीक चुरा आणि वालवा रेती यांच्यापासून इमारती उभारण्यात आल्या; पण आता याच निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे सज्जे कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

२. इमारत कोसळली की, राजकीय नेते, महानगरपालिकेचे अधिकारी आणि सरकार सहानुभूती दाखवते; पण त्यानंतर धोकादायक इमारतींविषयी काहीच निर्णय घेतला जात नाही, अशी टीका नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

आणखी किती बळी गेल्यावर स्थानिक प्रशासन धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली काढणार ?