धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत. (पूर्वार्ध)

प्रा. शंकर शरण

१. धर्मनिरपेक्ष नेते आणि बुद्धीवंत यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातील दुटप्पीपणा हीच मोठी समस्या !

‘काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी अलीकडेच लिहिले, ‘आमची स्थिती अशी झाली आहे की, कोणत्याही धर्माच्या बाजूने काहीही म्हटले, तरी कुणी ना कुणी त्याच्या भावना दुखावल्याचा दावा करतो.’ तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी कालीदेवीविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यावरून वादंग निर्माण झाला होता. त्यासंदर्भात शशी थरूर यांनी म्हटले, ‘अशा गोष्टी सहजतेने घेतल्या पाहिजेत; कारण यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो.’ शशी थरूर यांचे म्हणणे अगदी योग्य आहे. जोपर्यंत इस्लामच्या संदर्भात विधाने किंवा कृती केल्यावर मुसलमानांमध्ये रोष निर्माण होत नाही, तोपर्यंत थरूर यांच्यासारखे बहुतांश नेते आणि बुद्धीवंत गप्प रहातात. तेव्हा त्यांचा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराविषयी दुटप्पीपणा दिसून येतो. हीच तर मोठी समस्या आहे. सर्व संकटे याच दुटप्पीपणामुळे निर्माण होत असतात. लोक भावना दुखावण्यापेक्षा सरकार आणि बुद्धीवंत किंवा विचारवंत यांच्या दुटप्पीपणावर अधिक प्रक्षुब्ध होतात; कारण महुआ मोईत्रा यांच्या बाजूने म्हटली गेलेली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गोष्ट नूपुर शर्मा यांच्या वेळी अयोग्य असते. शर्मा यांनी तर हिंदु देवता भगवान शिव यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देतांना काही मत व्यक्त केले होते; परंतु महुआ यांनी सहजपणे देवीवर एक टिपणी केलेली आहे.

२. स्वधर्मावरील टीका आणि निंदा सहन करण्याच्या संदर्भात संपूर्ण जगात केवळ हिंदूंच सहिष्णु !

वस्तुत: दुटप्पीपणाची ही समस्या भारतात गेल्या १०० वर्षांपासून चालत आलेली आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे की, आपल्या धर्मावरील टीका आणि निंदा सहन करण्याच्या संदर्भात संपूर्ण जगात हिंदू अधिक सहिष्णु आहेत. ख्रिस्ती प्रचारक हे शतकांपासून हिंदु धर्म, देवी-देवता, प्रथा, परंपरा आदींवर उघडपणे टीका करत आले आहेत. ते साहित्य आणि भाषण यांच्या माध्यमांतून टीका करतात. एवढेच नाही, तर हिंदूंच्याच तीर्थक्षेत्रांमध्ये उभे राहून त्यांचाच धर्म आणि देवता यांना दुर्बल अन् अंधश्रद्धाळू म्हणण्यापर्यंत या ख्रिस्ती प्रचारकांची मजल गेली आहे. तरीही त्याकडे सर्वसामान्य हिंदु, विद्वान किंवा पुजारी कुणालाही लक्ष द्यावेसे वाटत नाही. हेच कृत्य इस्लामी तबलिगी हिंदु धर्माविषयी अधिक कठोरपणे करत आले आहेत. ते हिंदु आणि बौद्ध धर्मीय यांना ‘कुफ्र (काफिर)’ आणि ‘घृणास्पद मूर्तीपूजक’ आदी संबोधून त्यांच्यावर टीका करत असतात. देवीदेवतांना खोटे, तसेच हिंदु प्रथा, परंपरा, सण आणि उत्सव यांना चुकीचे ठरवत असतात. या गोष्टींपासून मुसलमानांना कठोरपणे लांब रहाण्यास सांगण्यात येते, तसेच हिंदूंचे रहाणीमान, खाणे-पिणे, वेशभूषा, चालीरिती, परंपरा, कौंटुबिक संबंध आदी गोष्टींविषयी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्यास मुसलमानांना मनाई करण्यात येते. या कट्टरतेच्या मागे ‘केवळ इस्लाम श्रेष्ठ असून इतर धर्म कनिष्ठ आहेत’, यावर जोर असतो. ख्रिस्ती प्रचारकांप्रमाणे इस्लामी तबलिगीही श्रीराम, श्रीकृष्ण, दुर्गा, सरस्वती आणि हिंदूंचे महापुरुष यांच्यावर टीका करत आले आहेत.

३. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अत्यंत प्रतिष्ठित हिंदु प्रकाशकाला मरणाच्या दाढेत लोटणारे मोहनदास गांधी !

३ अ. पुस्तकाद्वारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर गलिच्छ टीका करणारे मुसलमान आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशक राजपाल ! : सध्या नूपुर शर्मा यांच्या संदर्भात जे घडले, तेच १०० वर्षांपासून या भारतात होत आले आहे. वर्ष १९२० या वर्षी लाहोरमध्ये मुसलमानांकडून २ पुस्तके छापण्यात आली होती. त्यात भगवान श्रीकृष्ण आणि महर्षि दयानंद यांच्यावर आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. एका पुस्तकाचे शीर्षक होते, ‘कृष्ण तेरी गीता जलानी पडेगी !’ आणि दुसर्‍याचे शीर्षक होते, ‘बीसवी सदी का महर्षि !’ दोन्ही पुस्तकांमधील भाषा अतिशय गलिच्छ होती. या पुस्तकांत हिंदु धर्मावर घृणास्पद टीका होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आर्य समाजाच्या एका विद्वानाने ‘रंगीला रसूल’ हे पुस्तक लिहिले. त्यात प्रेषित महंमद यांच्या जीवनाचे वास्तविक वर्णन होते. लेखकाला त्यांचे नाव प्रकाशित करायचे नव्हते; परंतु हिंदुद्वेषी पुस्तकांचे उत्तरही देणे आवश्यक होते. तेव्हा त्यांनी प्रतिष्ठित प्रकाशक राजपाल (ज्यांच्या मुलांचे आज ‘राजपाल अँड सन्स’ आणि ‘हिंद पॉकेट बुक्स’ या प्रकाशन संस्था आहेत.) यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा लेखकाच्या नावाच्या ठिकाणी ‘दूध का दूध और पानी का पानी’ असे छापून पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले.

३ आ. राजपाल यांनी पुस्तक प्रकाशन केल्याने धर्मांधांनी त्यांच्यावर केलेले आक्रमण आणि त्यांचे बचावणे : हे पुस्तक प्रसिद्ध होताच धर्मांध मुसलमान प्रक्षुब्ध झाले. त्यांनी प्रकाशक राजपाल यांना लेखकाचे नाव सांगण्याचा आग्रह केला. त्यांचे न ऐकल्यास आक्रमण करण्याची धमकी दिली; परंतु राजपाल यांनी लेखकाला दिलेले वचन तोडले नाही. त्यामुळे वर्ष १९२६ मध्ये त्यांच्यावर खुदाबख्श नावाच्या धर्मांधाने सुर्‍याने आक्रमण केले. योगायोगाने त्याच वेळी आर्य समाजाचे संन्यासी स्वामी स्वतंत्रतानंद तेथून जात होते. त्यांनी राजपाल यांना वाचवले. खुदाबख्श पकडला गेला आणि त्याला ७ वर्षांचा कारावास झाला. राजपाल ३ मास रुग्णालयात भरती राहिल्यानंतर ठीक झाले. काही काळानंतर योगायोगाने राजपाल यांच्या दुकानात स्वामी सत्यानंद बसले होते. तेव्हा एका धर्मांधाने राजपाल समजून त्यांच्यावरच सुर्‍याने आक्रमण केले. तोही पकडला गेला आणि त्यालाही कारावास झाला. स्वामी सत्यानंद हे २ मास रुग्णालयात राहिल्यानंतर बरे झाले.

३ इ. मोहनदास गांधी यांनी राजपाल यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मुसलमानांनी राजपाल यांची केलेली हत्या ! : त्या वेळी मोहनदास गांधी यांनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ वृत्तपत्रात राजपाल यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक लेख लिहिला. त्यात ‘एका तुच्छ पुस्तक विक्रेत्याने थोड्या पैशासाठी इस्लामच्या पैंगंबरांवर टीका केली. त्यामुळे त्याचा प्रतिकार झाला पाहिजे’, असे लिहिले.

गांधी यांची भाषा एवढी गलिच्छ होती की, डॉ. आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह देशातील अनेक मोठ्या नेत्यांनीही त्यावर टीका केली. विशेषत: एका बाजूने कड घेतल्याविषयी आणि मुसलमानांना प्रक्षुब्ध करण्यासाठी गांधींनी राजपाल यांच्यासारख्या अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीवर गलिच्छ लिखाण करणे त्यांना आवडले नाही. त्यानंतर राजपाल यांच्या विरोधात नवीन फतवे आले, ज्यात देहलीच्या जामा मशिदीमधून गांधींचे मित्र मौलाना महंमद अली यांचे प्रक्षोभक भाषणही होते. त्यामुळे ६ एप्रिल १९२९ या दिवशी तिसर्‍यांदा राजपाल यांच्यावर त्यांच्या दुकानातच इलमदीन या धर्मांधाने सुर्‍याने आक्रमण केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा लाहोरमध्ये अनुमाने १ लाख लोकांनी शांती मोर्चा काढला, तसेच सर्व मान्यवरांनी राजपाल यांना श्रद्धांजली वाहिली. राजपाल यांचे पहिले जीवनचरित्र त्यांचे मित्र अब्दुल रहीम यांनी लिहिले आहे.

४. दुसर्‍यांच्या धर्माच्या संदर्भात अयोग्य गोष्टी करण्याला स्वतःचा अधिकार समजणारे धर्मांध मुसलमान !

वास्तविक त्याच ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होत आहे आणि ती आता अधिकच वाईट झाली आहे. अलीकडे उदयपूरमध्ये (राजस्थान) कन्हैयालालची हत्या केल्यानंतर त्याची चित्रफीत बनवून प्रसारित करण्यात आली. ही पुढच्या स्तरावरील दुर्गती आहे. बिचार्‍या कन्हैयालालने प्रेषित महंमद यांच्याविषयी स्वत: काहीच म्हटले नव्हते. त्याने वक्तव्य करणार्‍या नूपुर शर्माचे केवळ समर्थन केले होते. तरीही काही धर्मांधांना ‘त्याचा जीव घेणे’, हा त्यांचा अधिकार वाटला. त्यात थोडाही कायद्याचा विचार नव्हता, जसा तो १०० वर्षांपूर्वीही नव्हता. हीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धर्मांधांना दुसर्‍यांचा धर्म आणि देवता यांच्याविषयी उलटसुलट गोष्टी करणे, हा त्यांचा अधिकार वाटतो. काही वर्षांपूवी अकबरुद्दीन ओवैसी याने एका सार्वजनिक सभेत प्रभु श्रीराम आणि माता कौसल्या यांच्यावर खोचक टीका केली होती. त्याची चित्रफीत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. बेंगळुरूमध्ये भगवान श्रीकृष्णावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून एका हिंदूने काहीतरी वक्तव्य केले. त्यामुळे नंतर त्याच्यावरही प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते.

४ अ. दुसर्‍या धर्माची मते नष्ट करण्याला अधिकार समजणारा इस्लामी मतवाद ! : इस्लामी ग्रंथांमधील प्रेषित महंमद यांच्याविषयी लिखित गोष्टींचा पुनरुच्चारही हिंसाचार आणि दंगली यांना कारणीभूत बनतो. त्याहून गंभीर गोष्ट आहे की, इस्लामी मतवाद दुसर्‍या धर्माची मते नष्ट करण्यालाही त्याचा अधिकार समजतो. यात कोणतीही शंका नाही की, इस्लाम ‘खोट्या देवता’ आणि त्या स्थानांना नष्ट करण्याची अनुमती देतो, जेथे त्यांची पूजा केली जाते. तसेच अशी स्थाने नष्ट करण्याला योग्य समजले जाते.

५. हिंदूने धर्मरक्षणासाठी विधान केले, तरी अप्रसन्न होऊन हिंसाचार करणारे धर्मांध मुसलमान !

दुसरी समस्या अशी आहे की, एखाद्या हिंदूने त्याच्या धर्माच्या रक्षणासाठी काही केले किंवा विधान केले, तरी मुसलमानांमध्ये अप्रसन्नता दिसून येते. सामान्य इतिहासातील प्रसंगांमध्येही इस्लामी मतवाद आणि त्यांचे प्रेषित यांच्या संदर्भात पूर्णपणे प्रामाणिक गोष्ट समोर आणल्याविषयी ‘अवमान’ म्हणून हिंसाचार अन् गोंधळ माजवण्यात येतो. तेव्हा आमचे राजकीय नेते आणि बुद्धीवंत एकतर गप्प रहातात किंवा गांधींसारखे मुसलमानांची बाजू घेत हिंदूंवरच टीका करणे चालू करतात. त्या वेळी ते कायदा आणि राज्यघटना यांनाही खुंटीवर टांगायला मागे पहात नाहीत. अर्थात्च त्याने मुसलमान अधिकच प्रक्षोभक होतात.

– प्रा. शंकर शरण, नवी देहली