‘सी.बी.आय.’ने हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाची घेतली झडती
सोनाली फोगाट हत्या प्रकरण
पणजी, १८ सप्टेंबर (वार्ता.) – अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येच्या प्रकरणी अन्वेषणासाठी गोव्यात आलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सी.बी.आय.चे) पथक आणि ‘फॉरेन्सिक’ गट यांनी १८ सप्टेंबर या दिवशी हणजुणे येथील कर्लिस उपाहारागृहाची झडती घेतली, तसेच उपाहारगृहातील कर्मचार्यांची चौकशी केली. त्याचप्रमाणे कर्लिस उपाहारगृहाच्या ज्या शौचालयात फोगाट हत्या प्रकरणातील संशयित सुधीर संगवान यांनी लपवलेले अमली पदार्थ सापडले होते, त्या शौचालयाला टाळे ठोकले आहे.
The CBI team, which is probing the case, reached the Curlies restaurant on Sunday morning and started recording the staff’s statements | @arvindojha https://t.co/Q96sDGBmDB
— IndiaToday (@IndiaToday) September 18, 2022
तत्पूर्वी ‘सी.बी.आय.’ने १७ सप्टेंबर या दिवशी सोनाली फोगाट यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी निवासासाठी असलेल्या ‘द ग्रँड लिओनी रिसॉर्ट’ येथे सुमारे १० घंटे झडती घेतली. ‘सी.बी.आय.’ने येथील सोनाली फोगाट, संशयित सुधीर संगवान आणि संशयित सुखविंदर सिंह रहात असलेल्या ३ खोल्यांना टाळे ठोकले आहे. या वेळी ‘सी.बी.आय.’च्या गटाने काही कागदपत्रेही कह्यात घेतली आहेत. सी.बी.आय.च्या पथकाने सोनाली फोगाट यांना ज्या रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते, त्या ठिकाणच्या आधुनिक वैद्यांचीही चर्चा केली आहे. सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. सोनाली फोगाट यांना त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे. गोवा पोलिसांनी या अनुषंगाने या दोघांसह कर्लिस उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस आणि अन्य दोन अमली पदार्थ व्यावसायिक यांना कह्यात घेतले आहे. १५ सप्टेंबरपासून फोगाट हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण सी.बी.आय. करत आहे.