लातूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन उत्साहात साजरा !
लातूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) – मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाला ७४ वर्षे पूर्ण झाली असून हे अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाड्यातील जनतेच्या मुक्ती लढ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या लढ्यातील हुतात्म्यांना, लढ्यात सक्रीय सहभागी असणार्या स्वातंत्र्यसैनिकांना मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो. हा लढा सध्याच्या पिढीला कळावा, यासाठी या अमृत महोत्सवी वर्षात व्यापक कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे, असे राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. १७ सप्टेंबर या दिवशी मंत्री सुरेश खाडे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ध्वजारोहण केले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
लातूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन !
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नागरिकांना कळावा, यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रंथालयाने मराठवाडा मुक्तीसंग्राम काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, तसेच पुस्तकाचे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम शालेय अभ्यासक्रमात घ्या ! – राज ठाकरे, मनसे
मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही विलिनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे या लढ्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकवण्यात यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘संभाजीनगरकरांच्या उरावर बसलेल्या ‘रझा’कार आणि ‘सजा’कार यांचा मनसे लवकरच बंदोबस्त करेल.’’