गड-दुर्ग यांचे जतन होण्यासाठी महामंडळ किंवा प्राधिकरण स्थापना करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार्या शिवप्रेमींना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद !
मुंबई – छत्रपती शिवरायांचे गड-दुर्ग ही आपली परंपरा आणि इतिहास आहे. हा इतिहास टिकवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. गड-दुर्ग पूर्वीप्रमाणेच दिसावेत आणि त्यांचे जतन व्हावे, यांसाठी महामंडळ किंवा प्राधिकरण स्थापन करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ सप्टेंबर या दिवशी शिवप्रेमींना दिले.
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण आणि त्यांची होणारी दुरवस्था रोखावी, यासाठी १८ सप्टेंबर या दिवशी शेकडो शिवप्रेमींनी मंत्रालयावर मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी मोर्च्याला प्रारंभ झाला. मंत्रालयाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवल्यामुळे काही काळ फोर्ट येथील चाफेकरबंधू चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी मोर्चा आझाद मैदानावर गेला. ‘मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन भावना समजून घ्याव्यात’, अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्यानुसार दुपारनंतर आझाद मैदानावर येऊन मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील मागण्या !
१. गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करावी. त्यात इतिहासातील जाणकार व्यक्तींचाच समावेश करावा.
२. सर्व गड-दुर्ग यांचा जीर्णाेद्धार करण्यात यावा.
३. गड-दुर्ग यांवर प्लास्टिक, तसेच मद्यपान यांवर बंदी घालावी.
४. सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात मांसविक्रीला बंदी घालावी.
५. गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकामे, इस्लामिक आक्रमणे त्वरित हटवावीत.गड-दुर्गांवर स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत.
७. प्रत्येक गड-दुर्ग यांवर दैदिप्यमान संस्कृतीचे प्रतीक असणारा भगवा ध्वज कायमस्वरूपी उभारण्यात यावा.
८. गड-दुर्ग यांवरील पावित्र्य जपण्यासाठी ऐतिहासिक चित्रपट आणि माहितीपट वगळून सर्व चित्रीकरणावर बंदी घालावी.
गड-दुर्ग यांचे संवर्धन आणि सुशोभिकरण यांसाठी जे.जे. कला महाविद्यालयाचे साहाय्य घेण्याचा शासन विचार करत आहे, अशी माहिती सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
अतिक्रमण रोखण्यासाठी दुर्गमित्रांची नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !
पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी गड-दुर्ग यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. गड-दुर्ग यांवर होणारे अतिक्रमण, तसेच अन्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी ‘दुर्गमित्र’ ही संकल्पना चालू करण्यात येईल. यामध्ये स्थानिक तरुणांचा समावेश करून शासनाकडून त्यांना साहाय्य केले जाईल, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींना दिले.