‘सनातन संस्थे’चे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला दिनकर कसरेकर (वय ८६ वर्षे) यांचा खडतर साधनाप्रवास !
प.पू. भक्तराज महाराज (दिनकर) हे सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे गुरु होत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला दिनकर कसरेकर (जीजी) यांनी १८.९.२०२२ या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे देहत्याग केला. डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेल्या ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ या खंडातील कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. जीजींची आठवण येणे आणि त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांनी देहत्याग करणे‘रुग्णालयात पू. जीजींची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे’, हे कळल्यावर मला आनंद झाला. त्याच्या दुसर्याच दिवशी मला त्यांची आठवण आली आणि ‘त्यांना भेटायला जावे’, असे वाटले; पण दुसर्याच दिवशी दुपारी २ वाजता त्यांनी देहत्याग केल्याची बातमी मला समजली.’ – डॉ. जयंत आठवले (१८.९.२०२२) |
१. जीजी (गुरुपत्नी) यांचे बालपण
श्री. शंकर सदाशिव जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ. चंद्रभागा हे खामगाव (जिल्हा बुलढाणा) जवळील पौरझिरा नावाच्या लहानशा खेड्यात रहात असत. श्री. शंकरराव हे शंकरभक्त होते. त्यांना पाच अपत्ये झाली. त्यांच्या मधल्या मुलीचे नाव रेणुका. लाडाने सर्व जण तिला ‘वेणू’ म्हणत. हिचा जन्म चैत्र सप्तमी, शनिवार, ८ एप्रिल १९३६ या दिवशी रात्री एक वाजता शेगावजवळील खामगाव येथे झाला. हिलाच पुढे ‘जीजी’, गुरुपत्नी म्हणून सर्व जण ओळखायला लागले. घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे दुसर्यांच्या शेतात कापूस काढणे इत्यादी मजुरीची कामेही वेणूने केली. त्यामुळे तिचे शिक्षण विशेष झाले नाही. लहानपण पुष्कळ दुःखात गेले; मात्र वेणूने दुःख बाहेरून कधीही दाखवले नाही. ती आतल्या आतच रडायची. लहानपणी वेणूला अध्यात्माची आवड नव्हती. उलट गुरुमंत्र इत्यादी विषयांवरून तिचे दुसर्यांशी भांडणच व्हायचे.
२. दिनकर (प.पू. भक्तराज महाराज) यांचे बालपण आणि छंद
मध्यप्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील ‘मनासा’ येथे रहाणार्या श्री. सखारामपंत कसरेकर आणि सौ. अन्नपूर्णाबाई यांना ७ जुलै १९२० या दिवशी मुलगा झाला. मुलाचे नाव ‘दिनकर’ असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच दिनूची ओढ अध्यात्माकडे होती. भजने ऐकणे आणि करणे, हा त्याचा आवडता नाद. मंदिरात जाणे, प्रवचन ऐकणे आणि कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेणे, हे त्याचे छंद. मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर घरच्या गरिबीमुळे दिनू आणि त्याचे मित्र कामाच्या शोधात अनेक ठिकाणी फिरले. दिनकरने अनेक धंदे केले आणि सोडले. दिनूचा स्वभाव मिस्कील, थोडा खट्याळ आणि दुसर्यांना साहाय्य करणारा असा होता.
३. दिनकर आणि वेणू यांचा विवाह
दिनकर आर्थिकदृष्ट्या अजिबात स्थिरस्थावर झाला नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी घरचे कुणी मुली बघत नव्हते; म्हणून दिनकरने स्वतःच मुली पहायचे ठरवले. विक्रेता या व्यवसायामुळे दिनकर श्रीक्षेत्र शेगावला जात असे. तेथे श्री. सदाशिव महादेव कुळकर्णी यांचे लॉजिंग आणि बोर्डिंग होते. तेथे तो उतरत असे. कुळकर्णी यांची मेहुणी वेणू सतरा वर्षांची झाली, तेव्हा त्यांनी तिला त्यांच्या घरी शेगावला बोलावून घेतले. श्री. कुळकर्णी यांनी वेणूविषयी विचारल्यावर दिनकर तिला पहायला गेला. दिनकरने तिला पाहून स्वतःच लग्न पक्के केले आणि इंदूरला घरी तसे कळवले. १४ डिसेंबर १९४८ या दिवशी त्याचे लग्न झाले. लग्नात दिनकरने वेणूचे नाव ‘सुशीला’ ठेवले.
लग्नापूर्वी एका संतांनी वेणूला सांगितले होते, ‘‘तू शंकराला फुले वाहिलीस; म्हणून तुला सुंदर नवरा मिळेल; पण पुढचे काही सांगू शकत नाही.’’ पुढे जीवनभर कशी फरफट होणार आहे, ते सांगितले असते, तर बिचार्या वेणूची काय अवस्था झाली असती, याची कल्पनाच करवत नाही. निदान खोट्या आशेवर तरी ती जगत राहिली.
४. संसाराची परवड
इंदूरला धंदा चालत नाही म्हणून वर्ष १९४९ मध्ये दिनकर आणि सुशीला मुंबईला आले. दिनकरने कुर्ल्याला भाड्याने एक खोली घेऊन तिच्यात संसार थाटला. जवळ पैसा नव्हता. दिनकरला फक्त एक ताट, एक पातेले (टोप) आणि एक चमचा एवढेच सामान घरच्यांनी दिले. त्या पातेल्यात भात करायचा, तो काढून ठेवून त्यातच भाजी करायची आणि ती काढून आमटी करायची, असा त्यांनी स्वयंपाक केला. आमटी सिद्ध झाल्यावर जेवण वाढायचे म्हटले की, भात-भाजी तोपर्यंत गार झालेली असायची. दिनकर पुष्कळ ओरडायचा. जेवण आवडले नाही, तर फेकून द्यायचा. एकदा जेवणात केवळ मिरची नव्हती, तर त्याने ताट फेकून दिले. दिनकर आणि सुशीला यांच्या वयात पुष्कळ वर्षांचे अंतर अन् दिनकर शिकलेला आणि दिसायला रुबाबदार म्हणून सुशीला सतत दडपणाखाली असे. त्यात भर म्हणून दिनकर बर्याचदा म्हणायचा, ‘‘तुला मध्येच सोडून देईन.’’ यामुळे त्या वेळची १८-१९ वर्षांची बिचारी सुशीला किती मानसिक तणावाखाली जगत असेल, याची कल्पनाही करवत नाही.
५. गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांची भेट !
१९५१ ते १९५६ हा पाच वर्षांचा काळ सुशीलेच्या जीवनात व्यावहारिक दृष्टीने सर्वांत सुखाचा काळ होता. पुढे १९५६ साली दिनकर आणि सुशीला यांच्या जीवनात त्यांचे गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश आले. तेव्हापासून त्यांचे कौटुंबिक जीवन संपले ते सदाचेच. १९५६ ते १९६६ ही दहा वर्षे सुशीलाने इंदुरात हलाखीत काढली. गुरु श्री साईश घरी आले, तर तिला त्यांना पोटभर जेवूही घालता येत नसे. इंदूर येथील हाल म्हणजे काहीच नाहीत, हे पुढच्या मोरटक्का येथील वास्तव्यात जीजींना जे भोगावे लागले त्यावरून लक्षात येईल. इंदूरला ओळखीचे बरेच जण असल्याने ते साहाय्य तरी करायचे. मोरटक्क्याला सगळेच नवीन असल्याने फार हाल झाले. त्यात भर म्हणजे १९५६ साली गुरुप्राप्ती झाल्यानंतर दिनकरने संसारातून लक्ष पूर्णपणे काढून घेतल्याने मुलांच्या संगोपनाचे दायित्वही एकटीवरच पडले.
६. सहनशक्ती आणि साधना यांद्वारे खडतर जीवनाला सामोर्या गेलेल्या जीजी !
६ अ. मोरटक्का – गरिबीची परिसीमा : १९६६ ते १९८२ अशी सोळा वर्षे जीजी मोरटक्क्याला राहिल्या. जीजी मोरटक्क्याला प्रथम आल्या, तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की, फारच थोड्या जणांना भोगावे लागते, असे तीव्र दुःख त्यांना तेथे भोगावे लागणार आहे. त्या रहायला आल्या, तेव्हा तेथे फक्त एक झोपडी होती. पावसात, थंडीत त्यांचे फार हाल व्हायचे. प्रारंभी आठवड्याला एकदा बाबा यायचे आणि पैसे द्यायचे. अकोल्याचे श्री. देशमुख आदी दोन-तीन भक्तांचे पाच-दहा रुपयांचे धनादेश यायचे. धान्य, पीठ, तेल इत्यादी मासातील दोन दिवस पुरेल एवढेच बाबा आणून ठेवायचे; म्हणून नेहमीच जेवायचीही पंचाईत पडायची.
६ आ. जीजींचे खडतर सांसारिक जीवन : प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) शक्य असेल तेव्हा साहाय्य करायचे. जीजींना थोडेतरी साहाय्य व्हावे, म्हणून रामजीदादांचे सासरे श्री. मुजुमदार यांनी पिठाची चक्की काढून दिली. प्रत्येक रात्री सर्वांची दळणे झाली की, जात्याला लागलेले पीठ जीजी काढून घ्यायच्या. पुढे लोकांनी आरडाओरडा चालू केला; म्हणून तसे करणेही जीजींना बंद करावे लागले. दुष्काळात तेरावा मास म्हणून काही मुलेही जीजींकडे शिकायला म्हणून त्यांच्या घरच्यांनी ठेवली. मुलांच्या जेवणाखाण्याच्या व्ययाचे पैसेही गरिबीमुळे ते कधी देऊ शकत नसत. बाबांनी लावलेल्या लिंबाच्या झाडाची लिंबे विकून थोडेफार पैसे मिळायचे. अन्न थोडे आणि खाणारी तोंडे पुष्कळ. यामुळे कधी चिंचेच्या कोवळ्या पाल्यात तिखट घालून ते कुटून जीजी त्याचे गोळे करायच्या आणि प्रत्येकाला एकेक गोळा खायला द्यायच्या. ते गोळे खाऊन आणि पाणी पिऊन सर्वांनी ८ – ८ दिवस काढले आहेत. कितीही माणसे आली, तरी जीजींनीच स्वयंपाक करायचा, असा प्रारंभी बाबांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे इतर शिष्यांना जीजींना साहाय्यही करता येत नसे.
वर्ष १९६६ पासून १९९५ पर्यंत म्हणजे २९-३० वर्षे जीजींना बाबांचे केवळ दर्शन झाले आणि तेही केवळ भंडार्यांच्या वेळी. बाबांच्या आजारपणातही बाबा त्यांना जवळ ठेवून घेत नसत. हे अग्नीदिव्य जीजींनी प्रारंभी सहन केले ते त्यांच्यात आणि बाबांच्यात असलेल्या वयाच्या मोठ्या अंतरामुळे, बाबांच्या हुशारीमुळे येणार्या दडपणामुळे अन् नंतर सहन करू शकल्या, ते केवळ त्यांच्या सहनशक्तीमुळे आणि साधनेमुळे !
७. जीजींचे आध्यात्मिक जीवन
लग्न होईपर्यंत ‘साधना म्हणजे काय’, ते माहीत नसलेली वेणू लग्नानंतर जशी सुशीला झाली, तशीच बाबांची साधना पाहून हळूहळू साधक बनत गेली. बाबांमुळे मोठे संत घरी यायचे. त्यांची सेवा करायची, भंडार्यात सहभागी व्हायचे इत्यादी करता करता ‘साधकत्वही कसे वाढले’, हे जीजींना स्वतःलाही कळले नाही !
८. प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी गुरुमंत्र देणे
अनेक संतांनी जीजींच्या कडक परीक्षा घेतल्या, तसेच त्यांना भरपूर प्रेमही दिले. प.पू. श्री अनंतानंद साईश जीजींना असेही म्हणायचे, ‘‘तुला इतकुसे सुख देईन आणि त्रास भरपूर देईन.’’ (संत कोणाला सुख किंवा दुःख देत नाहीत. प्रारब्धात काय आहे, त्याची ते अप्रत्यक्ष सूचना देत असतात.)
वर्ष १९५६ मध्ये एकदा प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी जीजींना गुरुमंत्र द्यायचे ठरवले. त्यांनी जीजींना निरोप पाठवला; पण जीजी गेल्याच नाहीत. शेवटी बाबा (प.पू. भक्तराज महाराज) स्वतः गेले आणि त्यांनी पुष्कळ आग्रह केला. मग जीजी इंदूरहून मोरटक्क्याला प.पू. श्री अनंतानंद साईश यांच्याकडे गेल्या. तेथे पुढील संवाद झाला.
प.पू. श्री अनंतानंद साईश : सुशीला, —– हे नाम घे.
जीजी : मी मुलांकडे लक्ष देऊ कि नाम घेऊ ?
प.पू. श्री अनंतानंद साईश : फक्त सकाळी तीन वेळा आणि रात्री तीन वेळा घे.’
– संकलक डॉ. जयंत बाळाजी आठवले
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र – खंड १’)
जीजींचा स्वभावअ. सेवावृत्ती : भंडारा असो किंवा एरव्हीही स्वयंपाक करणे, भांडी घासणे, आवराआवर करणे इत्यादी सर्व कामे जीजी इतर शिष्यांपेक्षा कणभर जास्तच करत. कडाक्याच्या थंडीत रात्री इतरांना म्हणत, ‘‘झोपा’’ अन् स्वतः थंड पाण्यात भांडी घासत बसत. बाहेरगावाहून आलेल्या भक्तांना ओंकारेश्वर, महाकालेश्वर इत्यादी ठिकाणी दर्शनाला पाठवत आणि ते परतेपर्यंत अगदी दालबाटीसह स्वयंपाक सिद्ध करत. आ. प्रेमळ : बाबांच्या शिष्यांवर त्या आईप्रमाणे प्रेम करत. – संकलक डॉ. जयंत बाळाजी आठवले |
प.पू. जीजी यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले लिखाण आणि अन्य कुटुंबियांची छायाचित्रे आज जागेअभावी प्रसिद्ध करू शकलो नाही. – संपादक