प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी वात्सल्यमूर्ती प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांचा देहत्याग !
नाशिक, १८ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला. प.पू. जीजी म्हणजे वात्सल्यभावाचे मूर्तीमंत उदाहरणच होत्या. प.पू. बाबांच्या सर्व भक्तांना त्यांनी वात्सल्याने जोडून ठेवले होते.
प.पू. जीजींच्या पश्चात त्यांचे मोठे सुपुत्र पू. नंदू (हेमंत) कसरेकर, मधले सुपुत्र श्री. सुनील कसरेकर, धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर, तर मोठ्या स्नुषा सौ. स्मिता हेमंत कसरेकर, मधल्या स्नुषा सौ. नयना सुनील कसरेकर आणि धाकट्या स्नुषा सौ. नीलिमा रवींद्र कसरेकर, तसेच कु. दीपाली, कु. वैभवी, चि. सोहम् आणि कु. रेवा ही नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार कसरेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
प.पू. जीजी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार श्री क्षेत्र कांदळी (वडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथे १९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता होणार आहेत.
सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद देणार्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (कै.) सुशीला दिनकर कसरेकर !
‘भजन’, ‘भ्रमण’ आणि ‘भंडारा’ या तिन्ही माध्यमांतून अहोरात्र कार्य करणारे आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर (प.पू. जीजी) यांनी आज देहत्याग केला. वयाच्या १७ व्या वर्षी विवाह झाल्यानंतर त्यांनी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांचा संसार सांभाळण्याचे अवघड शिवधनुष्य आयुष्यभर पेलले.
प.पू. जीजी यांची साधना अत्यंत खडतर होती. जगदोद्धाराचे व्रत घेतलेल्या प.पू. बाबांचे संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष होत असतांना प.पू. जीजींनी मोठ्या धैर्याने आपला संसार केला. पुष्कळ कष्ट केले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना वाढवले.
अशा स्थितीतही त्या सर्व शिष्यांवर पुष्कळ प्रेम करत. आम्हाला त्यांचा प्रेमळ सहवास अनेक वर्षे लाभला. प.पू. बाबांच्या सर्व भक्तांना त्यांनी वात्सल्यभावाने जोडून ठेवले होते. प.पू. जीजींसारख्या थोर गुरुमाता आम्हाला लाभल्या, ही प.पू. बाबांचीच कृपा आहे. सनातनला जसे प.पू. बाबांचे आशीर्वाद लाभले, तसे प.पू. जीजींचेही आशीर्वाद लाभले. अनेकदा त्या सनातनच्या आश्रमांत आल्या आहेत आणि त्यांनी साधकांचे कौतुक करून त्यांना भरभरून आशीर्वादही दिले आहेत. त्यांच्या कृपाछत्राखाली सनातनचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे.
आता त्यांचा स्थुलातील सहवास लाभणार नाही; पण त्यांच्या प्रेमळ आठवणी नेहमीच स्मरणात रहातील.
या थोर गुरुमातेच्या चरणी शतशः प्रणाम आणि कृतज्ञता !
– डॉ. जयंत आठवले (१८.९.२०२२)