कोल्हापुरातील म्हशींचे दूध कट्टे बंद ठेवू नका !
जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांकडून कोल्हापूर महापालिकेला पत्र
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लंपी चर्मरोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने पशूधन मालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा संसर्ग केवळ गायींमधून होत असल्याने कोल्हापूर शहरात म्हशींचे दूध कट्टे बंद करू नयेत, असे पत्र जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांनी कोल्हापूर महानगरपालिकेला दिले आहे. कोल्हापूरचे दूध कट्टे ही कोल्हापूरची विशेष ओळख आहे.
पशूसंवर्धन उपायुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गोठ्यांमध्ये पहाणी केली असता म्हशींमध्ये लंपीची लागण झाल्याचे दिसून आलेले नाही, तसेच म्हशींच्या आजारांसाठीच्या नमुन्यांची पडताळणी केली असता ते ‘निगेटिव्ह’ आले आहेत. या रोगाचा प्रसार दुधातून होत नाही. जनावरांचे दूध उकळून प्यायल्यानंतर गुणधर्म वाढतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, कागल, आजरा आणि शाहूवाडी तालुक्यात लंपी चर्मरोगाचा शिरकाव झाला आहे. दुसरीकडे पशूधन सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, गोकुळ, तसेच पशूसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस मोहीम राबवण्यात येत आहे. लंपी हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य असल्याने रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड, चिलटे, तसेच बाधित जनावरांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे गावागावात फवारणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत.