श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !
महाराष्ट्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना विविध घटनांत २० जणांचा मृत्यू झाला. यांपैकी १४ जण पाण्यात बुडून मृत्यू पावले. मध्यप्रदेशात विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या वाहनाखाली आल्याने एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे मुलाचा आवाज कुणाला ऐकू आला नाही. योग्य काळजी घेऊन सतर्कता बाळगता येते; पण त्यात कुठे त्रुटी राहिली, तर क्षणात प्राणावर बेतते. त्यामुळे आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळतो. यातून बोध घेतला जात नाही. यंदाच्या विसर्जनाच्या वेळीही डीजेच्या दणदणाटावर डोळ्यांना त्रासदायक असलेल्या ‘लेझर लाईट्स’, तसेच ‘रंगीत प्रकाश’ योजनांत मनसोक्तपणे नाचण्याची हौस भागवून घेण्यात आली. हे श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे दृश्य वाटत नव्हते.
कहर म्हणजे मुंबईच्या काही भागांत सायंकाळी ७.३० च्या कालावधीत तासभर मुसळधार पाऊस झाला. यामध्ये विसर्जनासाठी निघालेल्या महाकाय श्री गणेशमूर्ती भिजल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुसळधार पाऊस चालू होता; पण तरीही डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणारे शांत बसले नव्हते. उलट त्यांना अधिक चेव चढला होता. राज्यात विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस चालू आहे. म्हणजे विसर्जनाच्या वेळी अचानक पाऊस आला आणि सर्वांची तारांबळ उडाली, असेही होण्याची शक्यता नव्हती. राज्यात ५ दिवस पाऊस पडणार, याची पूर्वकल्पना हवामान विभागाने दिली होतीच ! अनंतचतुर्दशीच्या २ दिवस आधीपासून सायंकाळच्या वेळेस पाऊस पडत होता. या अनुभवावरून पाऊस येण्याच्या आधी विसर्जन करता आले असते; पण मिरवणूक जेवढी विलंबाने काढता येईल, तेवढी ती विलंबाने काढायची, असा चुकीचा विचार होत असल्याचे लक्षात येते. हे सर्व ठाऊक असूनही विसर्जन मिरवणूक रेंगाळत नेणे खटकणारे होते. उत्सवास धार्मिक नव्हे, तर मनमानी स्वरूप असल्याने कुठेच धार्मिकता दिसली नाही.
या वेळी नवीन राजकीय समीकरणे बनल्याने त्यांचीही एकमेकांना उद्देशून झालेली हुल्लडबाजी पहाण्यास मिळाली. धार्मिक उत्सवही यांच्या तावडीतून सुटला नाही. आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. एका उत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग दुसर्या उत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.