व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘आजकाल घरी बनवलेल्या सकस आहारापेक्षा उपाहारगृहातील चमचमीत पदार्थ सेवन करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येते. तसेच मांसाहार करण्याचेही प्रमाण वाढले आहे. व्यक्ती घेत असलेल्या आहाराचा तिच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने एक चाचणी केली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
पहिल्या प्रयोगात व्यक्तीला उपाहारगृहातील शाकाहारी (मिक्स व्हेज) आणि मांसाहारी (फिशफ्राय आणि चिकनफ्राय) पदार्थ सेवन करण्यास देण्यात आले. दुसर्या प्रयोगात तिला सात्त्विक ठिकाणी (सनातनच्या आश्रमात) बनवलेली भाजी सेवन करण्यास देण्यात आली. प्रत्येक प्रयोगात व्यक्तीने पदार्थ सेवन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. व्यक्तीला हे पदार्थ सेवन करण्यास देण्यापूर्वी त्या पदार्थांच्याही चाचण्या करण्यात आल्या.
वाचकांना सूचना :‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळखया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१ अ. उपाहारगृहातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असणे; याउलट सात्त्विक ठिकाणी बनवलेल्या भाजीमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे : उपाहारगृहातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याउलट सात्त्विक ठिकाणी बनवलेल्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
१ आ. उपाहारगृहातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ सेवन केल्याने व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होणे; पण तिने सात्त्विक ठिकाणी बनवलेली भाजी सेवन केल्याने तिच्यावर सकारात्मक परिणाम होणे : व्यक्तीने उपाहारगृहातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी तिच्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा होती. तिने ते पदार्थ सेवन केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी झाली. याउलट व्यक्तीने सात्त्विक ठिकाणी बनवलेली भाजी सेवन केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. मांसाहारी पदार्थांतून प्रक्षेपित होणार्या तमोगुणी स्पंदनांमुळे ते सेवन करणार्याला आध्यात्मिक स्तरावर हानी होणे : मांसाहारी पदार्थ तमोगुणी आहेत. त्यामुळे तो सेवन केल्याने व्यक्तीतील तमोगुणात वाढ होते. याचा नकारात्मक परिणाम तिचा देह, मन अन् बुद्धी यांवर होतो. चाचणीतील व्यक्तीने मांसाहार केल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. थोडक्यात मांसाहार केल्याने तिला आध्यात्मिक स्तरावर हानी झाली. यातून नियमितपणे सप्ताहातून एकदा किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळा मांसाहार करणार्यांना किती अधिक प्रमाणात हानी होत असेल याची कल्पना येते. त्यामुळे मासांहार करणार्यांनी स्वतःचे शारिरीक, मानसिक अन् आध्यात्मिकदृष्ट्या आरोग्य चांगले रहावे यासाठी मांसाहार टाळून सात्त्विक आहार घेणे श्रेयस्कर !
२ आ. उपाहारगृहापेक्षा घरी बनवलेले सात्त्विक पदार्थ सेवन करावे : येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे उपाहारगृहातील शाकाहारी पदार्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्यामुळे चाचणीतील व्यक्तीला ते पदार्थ सेवन केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या लाभ न होता उलट हानीच झाली. पदार्थातील सात्त्विकता अनेक घटकांवर अवलंबून असते, उदा. पदार्थ बनवण्याचे ठिकाण, त्यामागील उद्देश, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी. हे घटक जितके सात्त्विक असतील तितका तो पदार्थ सात्त्विक बनतो. सात्त्विक पदार्थ सेवन केल्याने व्यक्तीला त्यातील सात्त्विकतेचा लाभ होतो. चाचणीतील व्यक्तीने सात्त्विक ठिकाणी (सनातनच्या आश्रमात) बनवलेली भाजी सेवन केल्याने तिला ‘तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होणे आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. व्यक्तीने सात्त्विक आहार सेवन केल्याने तिच्या मनात सात्त्विक विचार येतात. सात्त्विक विचारांमुळे तिच्याकडून सात्त्विक कृती होतात. यामुळे तिची वृत्तीही सात्त्विक बनते. त्यामुळे उपाहारगृहापेक्षा घरी बनवलेले सात्त्विक पदार्थ सेवन करावेत. घरी बनवलेल्या पदार्थांतील सात्त्विकता वृद्धींगत होण्यासाठी ते नामजप करत बनवावेत.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.६.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
व्यक्तीने सात्त्विक आहार सेवन केल्याने तिच्या मनात सात्त्विक विचार येतात आणि तिची वृत्तीही सात्त्विक बनते ! – संपादक |