‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आणि संकल्प यांमुळे वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे समाजातून ‘प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना आम्हाला ‘हे एक दैवी अभियान आहे’, याची प्रचीती आली. ‘देवाने या अभियानाचे पूर्वनियोजन आधीच करून ठेवले होते. आम्ही केवळ निमित्त होतो’, असे आम्हाला अनुभवता आले. या अभियानाला समाजातील विविध स्तरांतून मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसादातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. राज्यातील एका मंत्र्यांचा मिळालेला चांगला प्रतिसाद !
१ अ. सनातन संस्थेचे कार्य जाणून घेऊन एका मंत्र्यांनी हिंदी भाषेतील ग्रंथांची मागणी करणे : आम्ही एका मंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तिथे पुष्कळ लोक आले होते. आम्ही सनातन संस्थेचे साधक असल्याने त्यांनी आम्हाला प्राधान्याने ४५ मिनिटे वेळ दिला. ‘हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर विस्तृत चर्चा केली. आम्ही त्यांना ‘हलाल’ अर्थव्यवस्थेविषयी सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हलाल’ हा विषय संबंधित अधिकार्यांना सांगून त्यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू.’’ त्यासाठी त्यांनी त्या संदर्भातील सर्व पुरावे एकत्र करायला सांगितले. त्यांनी सनातन संस्थेविषयी सर्व माहिती समजून घेतली आणि त्यांच्या विद्यालयासाठी हिंदी ग्रंथांची मागणी केली.
१ आ. एका आमदारांनी सनातन संस्थेच्या कार्याची स्तुती करून ग्रंथ विकत घेणे : येथील एका आमदारांना संपर्क करून आम्ही त्यांना सनातन संस्थेचे माहितीपत्रक दाखवून सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे आणि आमचे कार्य एकच आहे. मी तुम्हाला माझ्या कुटुंबातीलच समजतो. तुमचे ग्रंथ फार चांगले आहेत. माझ्या कार्यक्षेत्रातील ग्रंथालये आणि शाळा यांमध्ये हे ग्रंथ ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन.’’ त्यानंतर त्यांनी काही ग्रंथ घेतले.
२. विद्यालये आणि महाविद्यालये यांच्याकडून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि ३१ डिसेंबर या वेळी वाराणसी येथील ज्या शाळांमधून सनातन संस्थेच्या उपक्रमांना प्रतिवर्षी प्रतिसाद मिळतो, अशी विद्यालये अन् महाविद्यालये यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी संपर्क केला. त्यालाही शिक्षक आणि प्राध्यापक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हा काहींनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादाच्या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.
२ अ. ‘सुधाकर महिला महाविद्यालया’चे प्राध्यापक श्री. प्रमोद पांडे यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून प्राचार्यांची भेट घालून देणे आणि निवासी संकुलात सनातन संस्थेचे प्रवचन ठेवण्याची सिद्धता दर्शवणे : ‘सुधाकर महिला महाविद्यालया’चे प्राध्यापक श्री. प्रमोद पांडे यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सनातन संस्था विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी करत असलेले कार्य विशद केले. त्यांना या संदर्भातील काही ग्रंथ दाखवल्यावर ते प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘मी मुलांना नेहमी सांगतो, ‘चांगले संस्कार आणि आचरण यांची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे.’ सनातन संस्था फार चांगले कार्य करत आहे.’’ त्यांनी त्यांच्या निवासी संकुलामध्ये सर्र्वांसाठी प्रवचन ठेवण्याची सिद्धता दाखवली. ते ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकाचे वर्गणीदारही झाले. ते म्हणाले, ‘‘मी तुमची आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी भेट घालून देतो आणि त्यांना ‘बालसंस्कार’ मालिकेतील ग्रंथ घेण्यास सांगतो.’’
२ आ. ‘ललिता शास्त्री’ विद्यालयाचे श्री. अवधेश श्रीवास्तव यांनी शाळेतील मुलांसाठी सनातन संस्थेचे सर्व उपक्रम राबवण्याची सिद्धता दाखवणे : ‘ललिता शास्त्री विद्यालया’चे श्री. अवधेश श्रीवास्तव हे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक आहेत. त्यांना सनातनचे आश्रम आणि विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याविषयीचे ग्रंथ यांविषयी सांगितले. तेव्हा त्यांना ‘संस्कार, राष्ट्र आणि धर्म’ या विषयांची आवड आहे’, असे लक्षात आले. त्यांनी संस्कार, राष्ट्र आणि धर्म या विषयांचे हिंदी भाषेतील ग्रंथ विकत घेतले. ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक आपला व्यवहार सांभाळून तळमळीने आणि सेवाभावाने धर्मकार्य करत आहेत. सनातनचे साधक ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके प्रती मासाला वेळेत आणि नियमितपणे वितरण करतात. त्यांच्यासारखी सेवाभावी वृत्ती मला अन्यत्र दिसली नाही.’’ त्यांनी सनातन संस्थेचे सर्व उपक्रम शाळेतील मुलांसाठी राबवण्याची सिद्धता दाखवली.
३. वाराणसी येथील ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या वाचकांचा ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्तम प्रतिसाद !
३ अ. साधकांच्या सेवाभावी वृत्तीमुळे वाचक प्रभावित होणे : वाराणसी येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना संपर्क केला. तेव्हा त्यांच्या मनात ‘सनातन संस्थे’विषयी आदर जाणवला. त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्था ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आमच्यापर्यंत अनमोल आध्यात्मिक ज्ञान पोचवते आणि आम्हाला साधनेच्या संदर्भात अमूल्य मार्गदर्शन करते. आम्हाला शक्य आहे, ते योगदान आम्ही देऊ.’’ वाचकांनी काही मोठे आणि लहान ग्रंथ घेतले. वाचकांशी बोलतांना ‘साधकांच्या सेवाभावी वृत्तीमुळे वाचक प्रभावित झाले आहेत’, असे आमच्या लक्षात आले.
३ आ. एका वाचकाने सांगितले, ‘‘आम्ही वर्गणी घेऊन आमच्या गावात देवीचे मंदिर बांधत आहोत. मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी मी ‘देवी’विषयी माहिती सांगणारे सनातन संस्थेचे ग्रंथ आलेल्या भक्तांना अवश्य वाटीन.
३ इ. ज्वेलरीचा व्यवसाय करणारे वाचक आणि हितचिंतक श्री. संतोष अग्रवाल यांना संपर्क करून सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या संदर्भात सांगितले. त्यांनी नववर्षानिमित्त भेट देण्यासाठी हिंदी भाषेतील काही मोठे ग्रंथ घेतले.’
– सौ. प्राची जुवेकर, वाराणसी (१९.२.२०२२)