ठाणे जिल्ह्यातील जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग झाल्यास ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करा ! – डॉ. रूपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
ठाणे – लंपी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता जराही नसून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. जिल्ह्यातील पशूपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग झाल्यास अथवा त्याची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशूवैद्यकीय चिकित्सालयाशी अथवा १९६२ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील लंपी त्वचारोगासंबंधीची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. सातपुते यांनी सांगितले की,
१. ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती आणि प्रदर्शने बंद करण्यात आली आहेत.
२. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपीरोगाचे १६ केंद्रबिंदू असून आतापर्यंत एकूण ४३ जनावरे बाधित झालेली आढळून आलेली आहेत.
३. ग्रामीण भागातील ६५ पशूवैद्यकीय चिकित्सालये आणि त्यातील पशूवैद्यकीय अधिकारी तत्पर आहेत. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात आवश्यक सर्व औषधे आणि लस यांचा साठा उपलब्ध असून सर्व क्षेत्रीय अधिकारी अन् कर्मचारी, तसेच यंत्रणा सतर्क आहेत. बाधित जनावरांना उपचार, रोग प्रतिबंधक लसीकरण यांसाठी कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा विनामूल्य देण्यात येत आहेत. कुणी पैसे घेतांना आढळ्यास त्वरित संपर्क करावा.