श्राद्धविधीसंदर्भात महत्त्वपूर्ण अध्यात्मशास्त्रीय विवेचन
#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. काल श्राद्ध कुणी करावे ? याविषयीची माहिती आपण पाहिली. आज मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास श्राद्धविधी कधी करावा ? तसेच श्राद्धाचे विधी वा स्वयंपाक यांसाठी वापरावयाची भांडी, हे जाणून घेऊया.
१. मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास श्राद्धविधी कधी करावा ?
१ अ. ‘सामान्यतः मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) प्रति वर्षी श्राद्ध करावे. मृत्यूतिथी ठाऊक नाही, पण केवळ मास ठाऊक आहे, अशा वेळी त्या मासाच्या अमावास्येला श्राद्ध करावे.’
१ अ १. श्राद्धाचा मास (महिना) ज्ञात असून तिथी ज्ञात नसल्यास त्या मासाच्या शुक्ल वा कृष्ण एकादशीस किंवा अमावास्येला श्राद्ध का करावे ? : ‘या दिवशी वायूमंडलात यमलहरींचे आधिक्य असल्याने त्या लहरींच्या प्रवाहातून पितरांना आवाहन करून त्यांना मंत्रोच्चाराचे बळ पुरवून वायूमंडलात अल्प कालावधीत आकृष्ट करणे सोपे असते. यमलहरींच्या आधिक्यदर्शक प्रवाहातून पितर पृथ्वीमंडलात सहज प्रवेश करू शकतात.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावानेही लिहितात.)
१ अ २. ‘मृत्यूतिथी आणि महिना दोन्ही ठाऊक नसल्यास, माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
१ अ ३. निश्चित मृत्यूतिथी ठाऊक नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
१ अ ४. पितरांचे श्राद्ध प्रतिदिन करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
१ अ ५. पितरांचे श्राद्ध प्रतिदिन करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे प्रत्येक मासाच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
१ अ ६. प्रत्येक मासाला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद आणि आश्विन या मासांच्या अमावास्यांना तरी करावे.
१ अ ७. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद आणि आश्विन या मासांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद मासातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.’ (हिंदु धर्माने इतके पर्याय दिले असतांनाही हिंदू श्राद्ध आदी करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण साहाय्य करू शकणार ? – संकलक)
२. श्राद्धाचे विधी वा स्वयंपाक यांसाठी वापरावयाची भांडी
२ अ. योग्य भांडी : ‘स्वच्छ धुतलेली, तसेच सोने, रूपे, कांसे यांची अन् मातीची नवी भांडी. प्रसंगी अन्न ठेवण्यास आणि वाढण्यास लाकडाची भांडी प्रशस्त आहेत.’
२ अ १. देवकार्यात निषिद्ध मानलेल्या चांदीच्या वस्तू श्राद्धात वापरणे योग्य असण्याचे कारण काय ?
सौवर्णं राजतं वाऽपि पितृणां पात्रमुच्यते । – मत्स्यपुराण, अध्याय १७, श्लोक २०
अर्थ : पितरांशी संबंधित विधींसाठी सोन्याचे किंवा चांदीचे पात्र वापरावे.
शिवनेत्रोद्भवं यस्मात् तस्मात् तत्पितृवल्लभम् ।
अमङ्गलं तद्यत्नेन देवकार्येषु वर्जयेत् ॥ – मत्स्यपुराण, अध्याय १७, श्लोक २३
अर्थ : चांदी शंकराच्या तृतीय नेत्रापासून उत्पन्न झालेली असल्याने ती पितृकार्यासाठी प्रशस्त आहे. परंतु देवकार्यासाठी ती अशुभ असल्याने या कार्यांत चांदीची पात्रे प्रयत्नपूर्वक वर्ज्य करावीत.
२ आ. अयोग्य भांडी : ‘श्राद्धाच्या वेळी लोखंडाची, स्टीलची किंवा कुठलीही फुटकी भांडी आणि शस्त्रे पितरांच्या दृष्टीस पडू नयेत. लोखंडाच्या दर्शनाने पितर परत जातात.’
३. काही कारणाने श्राद्धासाठी स्वयंपाक बनवू शकत नसल्यास काय करावे ?
‘अशा वेळी आमश्राद्ध करावे. आम म्हणजे न शिजवलेले अन्न. त्याने करायचे श्राद्ध ते आमश्राद्ध होय. ‘आपत्काली, भार्येच्या अभावी, तीर्थक्षेत्री आणि संक्रांतीच्या दिवशी आमश्राद्ध करावे’, असे कात्यायनाचे वचन आहे. आमश्राद्ध केव्हा करावे, याविषयीचा एक श्लोक आहे, तो असा –
द्रव्याभावे द्विजाभावे प्रवासे पुत्रजन्मनि । आमश्राद्धं प्रकुर्वीत यस्य भार्या रजस्वला ॥
– स्कंदपुराण, प्रभास खण्ड, अध्याय १, श्लोक २०६
अर्थ : द्रव्य नसता, ब्राह्मण मिळत नसता, प्रवासात, पुत्रजन्माच्या प्रसंगी आणि पत्नी रजस्वला असता आमश्राद्ध करावे.
‘ज्याला पार्वणश्राद्ध करण्याचा अधिकार असेल, त्यानेच आमश्राद्ध करायचे असते. मरीची सांगतो की, जे श्राद्ध ज्या तिथीस नियमित असेल, अशा अमावास्यादी श्राद्धांविषयी आमश्राद्धाचा पर्याय विहित आहे. मासिक आणि सांवत्सरिक श्राद्धांना हा पर्याय योजू नये.
अशा श्राद्धात इतर श्राद्धविधी यथोक्त करून, भोजन वाढण्याच्या प्रसंगी केवळ शिधा पुढे ठेवतात. आमान्नाचे प्रमाण पक्वान्नाच्या चौपट, दुप्पट किंवा निदान त्याच्याइतके असावे, असे सांगितले आहे. शूद्रांना आमश्राद्धच विहित आहे. (मत्स्यपुराण अध्याय १७, श्लोक ७०)’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English