अझरबैजान-आर्मेनिया संघर्षावर तोडगा काढण्याचे भारताचे आवाहन

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्या सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष चालू झाला आहे. सीमेवरील गोळीबारामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. वाद आणखी चिघळला, तर मध्यपूर्वेतील हे २ देश युद्धाच्या आगीत उडी घेतील. भारताने नुकतेच अझरबैजान आणि आर्मेनिया यांना शत्रुत्व संपवण्याचे आवाहन केले आहे. तसेच द्विपक्षीय संघर्षावर शांततेने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. बागची यांनी दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या आक्रमणांचा या वेळी उल्लेख केला.

१. आर्मेनियाने आपल्या सुरक्षा परिषदेत अझरबैजानने केलेल्या गोळीबाराचा अहवाल रशिया आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यांना पुरवण्याची घोषणा केली आहे.

२. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि त्यांचे साहाय्य मागितले.

३. अझरबैजानने आर्मेनियावर १२ सप्टेंबरच्या रात्री सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई केल्याचा आरोप केला आहे.