राजसमंद (राजस्थान) येथे मंदिराची भिंत पाडल्याने हिंदुत्वनिष्ठ संतप्त !

राजसमंद (राजस्थान) – येथील स्थानिक प्रशासनाने १६ सप्टेंबरच्या सायंकाळी रेलमगरा क्षेत्रात असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराची एक भिंत पाडली. भिंत अतिक्रमण क्षेत्रात बांधण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घटनास्थळी धाव घेऊन याचा विरोध केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतल्याने त्याला जोरदार विरोध झाला. त्यामुळे पोलिसांनी कह्यात घेतलेल्यांची सुटका केली. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतल्याचा आरोप मात्र फेटाळून लावला आहे.

नाथद्वाराचे पोलीस अधिकारी छगन पुरोहित यांनी माहिती दिली की, मंदिराच्या जवळ दुकाने उभारण्यात आल्याने काही लोकांनी मंदिराच्या परिसरात अतिक्रमण होऊ नये; म्हणून ही भिंत उभारली होती. स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई करत ती पाडली.

संपादकीय भूमिका

देशभरात अनेक ठिकाणी अल्पसंख्यांकांनी अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली आहेत. शहरांमध्ये रस्त्यांच्या मधोमधही ती उभारण्यात आली आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतेच प्रशासन काहीही करत नाही. त्यामुळे ‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?