१५ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ कह्यात !
हणजुणे, वागातोर आणि म्हापसा येथे पोलिसांच्या धाडी
राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येवर सरकारने कठोरतेने उपाययोजना कार्यवाहीत आणणे आवश्यक !
म्हापसा, १६ सप्टेंबर (वार्ता.) – पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हणजुणे आणि म्हापसा येथे धाडी टाकून १४ लाख ६० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. हणजुणे येथे टाकलेल्या धाडीत पोलिसांनी अमेरिकेचा नागरिक असलेल्या रॉबर्ट कासो या व्यक्तीला कह्यात घेतले. त्याच्याकडे १२ लाख रुपये किमतीचे एल्.एस्.डी. हा पदार्थ सापडला. म्हापसा येथे टाकलेल्या धाडीत स्थानिक नागरिक डायगो डिकॉस्ता याला पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ६० सहस्र रुपये किमतीचे एम्.डी.एम्.ए. आणि हशीश हे अमली पदार्थ सापडले.
वागातोर बार्देश येथील मँगो ट्री उपाहारगृहाजवळ हणजुणे पोलिसांनी धाड टाकून अमली पदार्थ बाळगणार्या एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीचे नाव अश्रफ कासिम असून तो कर्नाटकातील मंगळुरू येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे १ लाख २० सहस्र रुपये किमतीचा एम्.डी.एम्.ए. हा अमली पदार्थ सापडला. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणांचे पुढील अन्वेषण करत आहेत.
गेल्या १५ दिवसांत ३१ लाख ६९ सहस्र किमतीचे अमली पदार्थ कह्यात
गोव्यातील अमली पदार्थांची समस्या कधी संपुष्टात येणार ?
उत्तर गोवा जिल्हा पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथक यांनी गेल्या १५ दिवसांत ९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१ लाख ६९ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले असून ११ आरोपींनाही अटक केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे १४ लाख ५७ सहस्र रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये टांझानियाचे २, ब्रिटनमधील १, तर अन्य गोवा, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील भारतीय आहेत. गोवा पोलिसांनी शॅक आणि उपहारगृह यांच्या मालक यांचा अवैध कामांत सहभाग असल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.