साधकाच्या कुटुंबियांनी साधकाला साधनेत साहाय्य केल्यास कुटुंबियांच्या मृत्यूनंतरही देवाने त्यांची काळजी घेणे
१. साधिकेच्या आईचे निधन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेच्या आईने तिला साधनेसाठी केलेल्या साहाय्यामुळे देवाने आईला त्यागाच्या अनेक पटींनी फळ दिल्याचे सांगणे
‘माझ्या आईचे निधन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला धीर दिला. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुझ्या आईने तुला साधनेसाठी साहाय्य केले. त्यांनी तुझा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभाग करवून घेतला. तुझ्या आईंच्या या त्यागाचे फळ देवाने त्यांना अनेक पटींनी दिले आहे. त्या रुग्णाईत असतांना देवाने त्यांच्या वेदना न्यून केल्या. देवाने त्यांच्या प्रारब्धाची तीव्रता न्यून केली. त्यांना निधनानंतर चांगली गती मिळाली. ‘त्यांच्या पुढील प्रवासासाठी देव कसा विविध प्रकारे आणि विविध रूपाने त्यांना साहाय्य करत आहे !’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.’’
त्यांचे हे बोलणे ऐकून मला वाटले, ‘प.पू. गुरुमाऊलीने एकदा साधकांचा हात धरल्यावर ते शेवटपर्यंत त्यांचा हात सोडत नाहीत. त्यामुळे साधकांच्या जीवनात दुःख नाही. साधकांचे केवळ कल्याणच होते.’
२. आईच्या निधनानंतर साधिकेने घरी न जाता आश्रमातच राहून सेवा केल्याने आईला चैतन्याचा सूक्ष्म स्तरावर लाभ होणे
आईच्या निधनानंतर दळणवळण बंदीमुळे मी घरी न जाता आश्रमातच राहून सेवा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘तू अशा स्थितीतही घरी न जाता आश्रमात राहिल्याने आश्रम आणि तू करत असलेली सेवा यांतील चैतन्याचा तुझ्या आईला सूक्ष्म स्तरावर लाभ होत आहे.’’ त्या वेळी मला प.पू. गुरुमाऊलींच्या प्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता वाटली, ‘हे सर्व त्यांचेच नियोजन होते. त्यांना आईला लाभ करून द्यायचा होता.’
– कु. वर्षा जबडे, नागेशी, गोवा. (१९.५.२०२१)
|