मुंबई येथे आजपासून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ४१५ ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगर येथे १७ सप्टेंबरपासून ४१५ ठिकाणी विनामूल्य ‘आरोग्य शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, तरी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी केले आहे.
यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘बूथ’ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून १७ सप्टेंबर या दिवसापासून उत्सवाला प्रारंभ होणार असून २ ऑक्टोबर या दिवशी मोहनदास गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, ‘मन की बात’ कार्यक्रम, महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, बूस्टर डोस देणे, विनामूल्य आरोग्य पडताळणी, रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी शिबिर, विनामूल्य डोळे पडताळणी आणि चष्मे वाटप, सार्वजनिक विहिरींची स्वच्छता, विनामूल्य धान्य वाटप, बुद्धीजीवी संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शन अशा उपक्रमांचा समावेश आहे.