स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे साधकाला जाणवलेले महत्त्व !
१. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यापूर्वी स्वतः आणि स्वतःची सेवा एवढाच संकुचित विचार असणे
‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला जाण्यापूर्वी माझा स्वभाव पुष्कळ संकुचित होता. मी ‘मी आणि माझी सेवा’ एवढाच सीमित होतो. कुणी साधकांनी माझ्याकडे कोणतेही साहाय्य मागितले, तर मी ‘माझ्याकडून होणार नाही. मला अडचण आहे’, असे सांगत होतो; परंतु प्रत्यक्षात मला तशी अडचण नसायची.
२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना इतरांना साहाय्य करण्याचे महत्त्व समजणे आणि इतरांना उत्साहाने साहाय्य करणे
मी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला गेल्यानंतर मला इतरांना साहाय्य करण्याचे महत्त्व समजले. ‘मी आणि माझी सेवा यांतून जेवढी साधना होते, त्यापेक्षा दुप्पट साधना साधकांना साहाय्य केल्याने होते’, हे माझ्या लक्षात आले. आता साधकांनी मला साहाय्याविषयी विचारताच माझ्या मनात ‘तीही माझीच सेवा आहे’, असा विचार येतो आणि मी ती सेवा उत्साहाने करतो.
३. ‘साधकांना साहाय्य करतांना आनंदाने केले जाणे आणि देवाच्या कृपेने स्वतःची सेवाही आनंदाने पूर्ण करता येणे
काही वेळा मी माझी सेवा करत असतांना साधकांनी साहाय्यासाठी विचारल्यावरही मी लगेच त्यांना साहाय्य करतो. त्या वेळी ‘मी त्यांना साहाय्य केल्यानंतरही माझी सेवा वेळेत किंवा काही वेळा वेळेआधीही पूर्ण होते’, असे माझ्या लक्षात आले. काही वेळा साधकांना साहाय्य करतांना माझी सेवा अपूर्ण रहाते. तेव्हा मी थोडे जागरण करून सेवा पूर्ण करतो. जागरण करून सेवा करतांना मला झोप येत नाही किंवा निरुत्साहही वाटत नाही, तर आनंद जाणवतो. हे सर्व केवळ गुरुकृपेनेच साध्य झाले आहे.
४. सतत अनुसंधानात राहिल्यास घडलेला प्रसंग सहज स्वीकारता येणे
मला काही वेळा काही प्रसंग स्वीकारता येत नाहीत. याविषयी मी चिंतन केल्यावर ‘ज्या प्रसंगात मी देवाच्या अनुसंधानात रहातो, त्या प्रसंगाचा माझ्याकडून सहज स्वीकार होतो आणि ज्या प्रसंगात मी देवाच्या अनुसंधानात नसतो, त्या प्रसंगाचा माझ्याकडून स्वीकार होत नाही’, असे माझ्या लक्षात आले. ‘त्यावरून देवाच्या अनुसंधानात रहाणे किती महत्त्वाचे आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.’
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |