हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे पुण्यात नवरात्रोत्सवात होणारे ‘सेक्स-तंत्र शिबिर’ रहित !
पुणे – हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे येथील कॅम्प भागात होणारे ‘सेक्स तंत्र’ शिबिर रहित केले असल्याचे शिबिराचे आयोजक उत्तरप्रदेश येथील रवि सिंग यांनी पुणे पोलिसांना कळवले आहे. या शिबिराचे विज्ञापन सामाजिक माध्यमांवर प्रसारित होताच हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांच्याकडून या शिबिराला प्रचंड विरोध झाला. त्यानंतर हे शिबिर रहित करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात ‘सेक्स तंत्र’च्या नावाखाली तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा घाट
कॅम्प परिसरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘सत्यम् शिवम् सुंदरम् फाउंडेशन’च्या वतीने ‘सेक्स तंत्र’ नावाने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होते. या प्रशिक्षणाचे ‘ऑनलाईन बुकींग’ चालू झाले होते. १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी या लैंगिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५ सहस्र रुपये शुल्क असलेल्या या लैंगिक प्रशिक्षण शिबिरात ‘ध्यानधारणा कशी करावी ?’ आणि ‘कामसूत्रातील लैंगिक क्रिया’ यासंदर्भात प्रशिक्षण देणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे होते.
आयोजकांवर गुन्हे नोंद करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
पुणे शहरात लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली नवरात्रोत्सवात ३ दिवसांचे ‘सेक्स-तंत्र’ शिबिर आयोजित करण्यात आल्याचे विज्ञापन प्रसारित झाले आहे. हिंदूंच्या पवित्र नवरात्रोत्सवाला कलंकित करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. ज्या नवरात्रीमध्ये स्त्रीचे देवीस्वरूपात पूजन केले जाते, त्याच कालावधीत स्त्रीला विकृत स्वरूपात दाखवणे, ही मानसिक विकृतीच आहे. या प्रकारातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि राज्य महिला आयोग यांनी या विकृतीची गंभीर नोंद घेऊन आयोजकांवर कठोर कलमांतर्गत गुन्हे नोंद करावेत, तसेच सदर कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.
‘हिंदूंच्या उत्सवाच्या निमित्ताने असे अश्लील स्वरूपातील शिबिर ठेवून धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. तसेच सदर विज्ञापनावरून हे ‘सेक्स रॅकेट’ तर नाही ना ? याचीही पोलिसांनी सखोल पडताळणी केली पाहिजे. या विकृतींना तात्काळ पायबंद घातला पाहिजे’, अशी मागणी करण्यासह हिंदु जनजागृती समितीने समविचारी संघटनांसह या कार्यक्रमाला तीव्र विरोध करण्याची चेतावणी दिली होती.
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीनेसुद्धा पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता सुरेखा डाबी, अधिवक्ता राणी सोनवणे, अधिवक्ता मनीषा कालेकर, कु. क्रांती पेटकर हे उपस्थित होते. ‘सेक्स तंत्र’ या शिबिराचे आयोजन करणार्यांवर गुन्हे नोंद करून या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत हे शिबिर रहित करण्याविषयी, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याविषयी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना निवेदन दिले. आनंद दवे यांनी या शिबिराविषयी सांगितले की, लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याचा घाट आहे. हा हिंदू आणि त्यांच्या देवता यांचा अपमान आहे. ब्राह्मण महासंघ हे कदापि सहन करणार नाही. या पत्रकामध्ये आयोजकांचा पत्ता, नाव किंवा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार त्याची माहिती देण्यात आलेली नाही. यावरून हे सर्व फसवे आणि घाणेरडे असून नवीन विकृतीला जन्म देणारे ठरणार आहे.
‘सदर शिबिराच्या नावाखाली ‘सेक्स रॅकेट’ सक्रीय होत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुणे पोलीस आणि गृहमंत्री यांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करावी’, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. मनसेनेही या शिबिराला विरोध दर्शवला.
संपादकीय भूमिका
|