शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि दलाल यांची चौकशी होणार !

नाशिक येथे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे घोटाळा प्रकरण

नाशिक – पोलीस कर्मचार्‍यांच्या स्थानांतरासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देणारी यंत्रणा उघडकीस आल्यानंतर शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी १५ सप्टेंबर या दिवशी दिले आहेत.

१. पोलीस कर्मचार्‍यांनी वर्ष २०१९ ते २०२२ या कालावधीत स्थानांतरासाठी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी चालू करण्यात आली आहे. या घोटाळ्यात वरिष्ठ महिला लिपिक आणि लिफ्टमॅन यांना अटक करण्यात आली आहे.

२. धुळे आणि नाशिक शासकीय रुग्णालयांचे तत्कालीन सिव्हिल सर्जन अन् अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरींचे बनावट प्रमाणपत्र मिळाले आहे.

३. पोलीस कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा स्थानांतरासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्यांची स्वाक्षरी आणि शिक्का असलेले प्रमाणपत्र आवश्यक असते.

४. रुग्णालयाचे कर्मचारी कांतिलाल गांगुर्डे यांनीच बहुतांश प्रमाणपत्रे दिल्याचे अन्वेषणात पुढे येत आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कटकारस्थान केल्याचे कलम आरोपांमध्ये वाढणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षकांनी बनावट प्रमाण पडताळणीविषयी पत्र दिले होते. संबंधित आधुनिक वैद्यांचा अभिप्राय घेतला होता. त्याचा अहवालही पाठवण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोषी असलेले आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होईल.

– डॉ. अशोक थोरात, शल्यचिकित्सक