सरकारकडून गृहनिर्माण विभागाचे सर्व निर्णय रहित !
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना चपराक !
मुंबई – शिंदे-भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय रहित करण्याचा धडाका लावला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण विभागातील सर्व शासन निर्णय शिंदे-भाजप सरकारने रहित केले आहेत, तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार म्हाडा आणि विभागीय मंडळ यांना देण्यात आले आहेत. राज्यशासनाने या संदर्भातील अध्यादेश नुकतेच लागू केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माणमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दायित्व होते. त्यांनी अनेक निर्णय घेतांना म्हाडाविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. म्हाडाचे सर्व अधिकार काढून घेत ते त्यांनी सरकारकडे ठेवले होते. म्हाडाचे प्रस्ताव सिद्ध करणे आणि ते सरकार दरबारी पाठवणे इतकी मर्यादित कामे होती. म्हाडा अधिकार्यांच्या भ्रष्ट कारभारावर वचक बसावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय घेतल्याचे आव्हाड यांनी म्हटले होते. आता आव्हाड यांनी घेतलेले शासन निर्णय नव्या सरकारकडून रहित करण्यात आले आहेत.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पुन्हा एकदा सर्व अधिकार हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात् म्हाडा, तसेच विभागीय मंडळांना दिले आहेत. सध्या गृहनिर्माण विभागाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ‘म्हाडाला पूर्वीप्रमाणे अधिकार बहाल करण्यात येतील’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते, तसे आदेशही गृहनिर्माण विभागाला दिले होते. त्याप्रमाणे १५ सप्टेंबर या दिवशी प्रत्येक निर्णय रहित केला आहे.