राबोडी (ठाणे) येथील वर्ष २००८ मधील दंगल प्रकरण
१६ जणांची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता !
ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे शहराच्या राबोडी परिसरात नवरात्रीच्या कालावधीत २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हिंदु आणि मुसलमान यांच्या २ गटांतील समूहाने एकमेकांवर आक्रमण केले. यामध्ये काही हिंदू घायाळ झाले होते. आक्रमण आणि दगडफेक केल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आलेली होती. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. रचना आर्. तेहरा यांनी सबळ पुराव्याअभावी १६ जणांची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्तींनी निकालात स्पष्ट केले की, सरकारी पक्षाला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात अपयश आले.
या खटल्यात युक्तीवाद करतांना सरकारी अधिवक्ता यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नवरात्रोत्सव चालू असतांना २ घरांवर अचानक आरोपींनी दगडफेक करत आक्रमण केले. यात सोडावॉटरच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. जमावाने घरे आणि पार्किंग केलेल्या गाड्या पेटवल्याचा युक्तीवाद केला. बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता मकरंद एस्. अभ्यंकर यांनी सांगितले की, या प्रकरणात समाविष्ट असलेल्या आरोपींना या गुन्ह्यात आणले आहे. त्यामुळे त्यांची मुक्तता करणे आवश्यक आहे. याच खटल्याच्या काळात आरोपी असलेल्या अवधूत रमाकांत नलावडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना या खटल्यातून वगळण्यात आले. न्यायालयासमोरील साक्षी-पुरावे आणि दोन्ही पक्षांच्या युक्तीवादात सरकारी पक्षाला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत १६ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.