हिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील !

पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सौदी अरेबियातील मक्का येथील मक्केश्‍वर महादेव मंदिराची तोडफोड करून मुसलमान आक्रमणकर्त्यांनी त्याला ‘मक्का’ बनवले. एक दिवस हिंदु ते मंदिर पुन्हा कह्यात घेतील; कारण मक्केश्‍वर महादेव हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सध्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य चालू आहे. लवकरच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात येईल’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी मांडलेली सूत्रे

१. भारतात अनेक मठ आणि मंदिरे यांना तोडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या. हे घृणास्पद कार्य सनातन धर्मियांच्या धर्मांतरासाठी करण्यात आले. आता सनातन धर्मीय गुलामीच्या भावनेतून मुक्त होत आहेत. त्यांनी जे गमावले होते, ते पुन्हा घेण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण होत आहे.

२. कुटुंब नियोजनाला मुसलमान आणि ख्रिस्ती मानत नाहीत. याला केवळ हिंदू मानतात आणि त्यामुळे त्यांची संख्या न्यून होत आहे. हिंदू पूर्वी ब्रह्मचर्येचे पालन करत होते. त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण रहात होते. आता प्राचीन परंपरा नष्ट होत आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे !

जगातील ५३ देशांमध्ये हिंदू रहातात. काही मासांपूर्वी हिंदूंचे एक संमेलन झाले होते. त्यात विदेशांतील अनेक हिंदूंनी सहभाग घेतला होता. त्यांचे म्हणणे होते, ‘भारताच्या राजकीय दिशाहिनतेमुळे आमचे हात-पाय बांधलेले आहेत.’ ज्या दिवशी भारत स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करील त्यानंतर काही काळातच १४-१५ देशही स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील. काही जणांना प्रश्‍न पडेल की, हे कसे होऊ शकते ? सर्वांना हे मानायला हवे की, आदिकाळापासून आमच्या सर्वांचे पूर्वज सनातनी वैदिक हिंदु होते. त्यातूनच हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे. याला मुसलमान विरोध करणार नाहीत; कारण त्यांना ठाऊक आहे की, त्यांचे पूर्वज सनातनी हिंदु होते.

मदरशांचे सर्वेक्षण योग्यच !

जर मदरशांवर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप होत असेल, तर त्यांची चौकशी केली पाहिजे. यात काहीच चुकीचे नाही. सत्य समोर आले पाहिजे. तसेच मदरशांच्या व्यतिरिक्त मठ किंवा मंदिरे यांवर असे आरोप झाले, तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय चुकीचा नाही; कारण यापूर्वी मदरशांमधून आश्‍चर्यजनक प्रकरणे समोर आली आहेत. मदरशांत काय होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. जर एखाद्या संस्थेचा वापर कुणाला तरी दाबण्यासाठी होत असेल आणि तेथे आतंकवादी प्रशिक्षण देण्यात येत असेल, तर त्याला आतंकवादाचे केंद्र म्हणणे अयोग्य नाही.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी अघोषितच रहातील !

शारदा आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांचे उत्तराधिकारी घोषित करण्यात आले आहेत. यावर शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती म्हणाले की, शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांच्या जीवनकाळात कधीच कुणाला उत्तराधिकारी घोषित केले नव्हते. ज्यांना आता घोषित केले आहे, ते अघोषितच आहेत. ‘शंकराचार्यांनी उत्तराधिकार्‍यांच्या नावांची घोषणा का केली नव्हती ?’, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे; मात्र गादीची परंपरा आहे, त्याचे पालन केले पाहिजे.