रोपवाटिकेतून आणलेल्या रोपांची लागवड

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

मागील आठवड्यातील लेखात आपण ‘घरी उपलब्ध असणार्‍या बियांपासून लागवड कशी करावी’, हे पाहिले. आजच्या लेखात ‘रोपवाटिकेतून आणलेली रोपे आपल्या लागवडीत कशी लावावीत’, हे पाहू. हा लेख वाचून स्वतः अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष लागवड करून पहा !

१. रोपवाटिकेतून रोपे आणण्याचे लाभ 

ड्रममध्ये लावलेले केळीचे झाड

‘रोपवाटिकेमध्ये फळांची, तसेच फुलांची कलमी झाडे उपलब्ध असतात. बियांपासून लावलेल्या काही फळझाडांना फळधारणा होण्यासाठी अधिक कालावधी लागतो; परंतु कलमी झाडांना २ – ३ वर्षांत फळधारणा होते.

काही रोपवाटिकांमध्ये फळझाडे, फुलझाडे यांच्याप्रमाणे वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर अशा भाज्यांची बियांपासून सिद्ध केलेली रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. अशी तयार रोपे मिळाल्यास रोपे बनवण्याचे आपले श्रम वाचतात आणि आपल्याला थेट लागवड करता येते.

आपल्या छतावरील लागवडीमध्ये मोठ्या कुंड्या, ड्रम किंवा वाफे यांमध्ये फळझाडांची लागवड करता येते. (छायाचित्रे पहा.) वाफ्यामध्ये (विटांनी बनवलेल्या कप्प्यामध्ये) फळझाडाची लागवड केल्यास ती नेहमी मध्यभागी करावी. त्यामुळे फळझाडांची मुळे आडवी पसरण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते.

केवळ २ विटांच्या उंचीच्या वाफ्यामध्ये लावलेले पपईचे झाड

२. लागवडीसाठी फळझाडांची निवड 

सौ. राघवी कोनेकर

आगाशीमध्ये किंवा घराभोवती लागवड करतांना फणस, जांभूळ, काजू, गावठी आंबा, उंच वाढणारा नारळ असे मोठे वृक्ष लावणे टाळावे. कलमी आंबा, सीताफळ, पेरू, चिकू, डाळिंब, अंजीर, पपई, लिंबू, केळी अशी फळझाडे आगाशीत लावता येतात. या झाडांच्या फांद्यांची नियमित छाटणी करून त्यांचा आकार आटोक्यात ठेवावा. त्यामुळे आगाशीत त्यांची निगा राखणे सोपे होते. खिडकीमध्ये कुंड्या ठेवून त्यांच्यामध्ये फळझाडे लावायची असतील, तर लिंबू, अंजीर, डाळिंब अशा मध्यम आकाराच्या झाडांची निवड करावी.

३. रोपवाटिकेतून आणलेली रोपे लावण्याची पद्धत

रोपवाटिकेमधून रोपे आणल्यावर लगेचच ती पिशवीतून काढून कुंड्यांत लावू नयेत. त्या रोपांना आपल्या लागवडीतील वातावरणाशी जुळवून घेता यावे, म्हणून २ – ३ दिवस तसेच ठेवून द्यावे. या कालावधीत त्या रोपांना नियमित पाणी द्यावे. रोपे आणल्यावर लगेचच लावली, तर काही वेळा मुळांना धक्का लागणे किंवा अचानक वातावरणात पालट होणे यामुळे रोपे मरून जाण्याची शक्यता असते.

रोपवाटिकेतील रोपे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन अल्प झाल्यावर कुंड्यांत किंवा वाफ्यांत लावावीत. रोपांची मुळे उन्हाला संवेदनशील असल्यामुळे उन्हाची वेळ टाळावी. रोप लावण्यापूर्वी त्यावर ‘बिजामृता’चा संस्कार अवश्य करावा. ‘बीजामृत’ म्हणजे देशी गायीचे शेण, गोमूत्र, चुना इत्यादींचा वापर करून बनवलेले नैसर्गिक मिश्रण. याच्या वापराने बुरशीजन्य रोगांपासून रोपाचे संरक्षण होते. बिजामृताविषयीचा सविस्तर माहितीपट (व्हिडिओ) सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची मार्गिका खाली दिली आहे.

४. फळझाडांची घ्यायची काळजी

मोठ्या फळझाडांच्या संदर्भातही नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना आच्छादन करावे (झाडाच्या मुळाजवळची माती पालापाचोळ्याने झाकावी), तसेच मर्यादित प्रमाणात पाणी द्यावे.

४ अ. जीवामृत देणे : झाडाला दर १५ दिवसांनी १० पट पाण्यामध्ये पातळ केलेले जीवामृत द्यावे. हे जीवामृत अगदी मुळाशी न देता थोड्या लांब अंतरावर (झाडाची पाने जेवढ्या अंतरावर पसरलेली असतील, तेवढ्या अंतरावर) द्यावे. जीवामृत सकाळी लवकर किंवा सायंकाळी द्यावे. हे देण्यासाठी उन्हाची वेळ टाळावी. मातीत ओलावा असतांनाच जीवामृत द्यावे. ओलावा नसल्यास झाडाला आधी थोडे पाणी देऊन मग जीवामृत द्यावे. फळझाडांसाठी जीवामृत देण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे ठेवावे.

४ आ. जिवामृताचे तुषारसिंचन (फवारणी) करणे : प्रत्येक पौर्णिमेला (आणि शक्य असल्यास अमावास्येलाही) जीवामृत आणि आंबट ताक यांच्या मिश्रणाचे तुषारसिंचन (फवारणी) करावे. यासाठी पाणी न घातलेले जीवामृत गाळून घ्यावे. हे गाळलेले जीवामृत ७५ मि.लि., आंबट ताक २५ मि.लि. आणि पाणी १ लिटर या मात्रेमध्ये तुषारसिंचकामध्ये (स्प्रेयर किंवा स्प्रेची बाटली यांत) घेऊन तुषारसिंचन करावे. असे तुषारसिंचन सर्व फळभाज्या, तसेच फुलझाडे यांवरही करावे. जिवामृताच्या तुषारसिंचनामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वातावरणातील पालट आणि विषाणूजन्य रोग यांपासून पिकांचे संरक्षण होते.

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.

सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका किंवा QR code : https://www.sanatan.org/mr/a/82985.html