राज्यातील ४७० गावांमध्ये लंपी रोगाचा संसर्ग !
मुंबई – महाराष्ट्रातील ४७० गावांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर २२ जिल्ह्यांतील २ सहस्र ५३५ गावांतील ७ लाख जनावरांना लस टोचण्यात आली आहे, अशी माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, सातारा, बुलढाणा, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांतील ६४ जनावरे लंपी आजारामुळे दगावली आहेत. राज्यातील एकूण ३ सहस्र ५१९ जनावरांना लंपी रोगाची बाधा झाली होती. त्यातील १ सहस्र ७५६ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. उर्वरित पशूंवर उपचार चालू आहेत. लंपी रोगाच्या नियंत्रणासाठी राज्यात १६ लाख ४९ सहस्र लसीच्या मात्रा उपलब्ध असून आणखी ५० लाख लसींच्या मात्रा आठवडाभरात प्राप्त होतील. बाधित गावांच्या ५ किलोमीटर क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा आणि मोठे गोठे किंवा अधिक पशूधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.