कोल्हापूर महापालिकेने यंत्राद्वारे श्री गणेशमूर्तींचे केलेले विसर्जन हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य !
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ! – धर्मप्रेमी रामभाऊ मेथे यांची पोलिसात तक्रार
कोल्हापूर, १५ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर महानगरपालिकेने स्वयंचलित यंत्राद्वारे (‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे) श्री गणेशमूर्तींचे केलेले विसर्जन हे समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धा दुखावणारे कृत्य असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. या संदर्भात कायदेतज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे हेही उपस्थित होते.
या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यंत्राद्वारे विसर्जन चालू असतांना तेथे उपस्थित असणारे काही कर्मचारी श्री गणेशमूर्ती ट्रकमधून खाणीत फेकून देत असतांनाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकारामुळे महापालिकेने समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या आहेत. तरी या संदर्भात संबंधितांवर त्वरित गुन्हा नोंद करण्यात यावा.