आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचा विकास होण्याची आवश्यकता

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, तरी आदिवासींच्या स्थितीमध्ये विशेष पालट झालेला नाही. यावर प्रकाश टाकणार्‍या या लेखाचा पूर्वार्ध आपण कालच्या अंकात पाहिला. आज या लेखाचा उत्तरार्ध पाहूया.

(उत्तरार्ध)

पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/612719.html

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

६. विविध कारणांमुळे आदिवासींना विस्थापित व्हावे लागणे

आदिवासींना विकासासाठी मोठी किंमत चुकवावी लागली. जवळपास ९० टक्के कोळशाच्या खाणी आणि ४ सहस्रांपेक्षा अधिक धरणे आदिवासी भागामध्येच झाली. त्यामुळे तेथील आदिवासींना विस्थापित व्हावे लागले. त्यासमवेतच जंगल आणि त्यावर आधारित लाकूड, औषधी वनस्पती आदिवासी भागांत मिळत असल्यामुळे विस्थापितांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे.

७. आदिवासींचे अन्य प्रश्न

अ. आदिवासी स्त्रियांच्या संदर्भात लैंगिक हिंसेचे प्रकार चालू असतात. जागतिकीकरणाचा परिणाम त्यांच्यावरही होत आहेत.
आ. पर्यावरणाच्या वेगाने होणार्‍या विनाशामुळे आदिवासी भागातील जैवविविधतेची हानी होत आहे.
इ. त्यांची मूळ संस्कृती नष्ट होत असून शहरीकरणाचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. दारिद्र्य, कुपोषण, अज्ञान, अनारोग्य, व्यसनाधीनता, धर्मशिक्षणाचा अभाव असे अनेक प्रश्न आहेत.
ई. आदिवासींची शिक्षणामध्ये योग्य ती प्रगती अद्याप झालेलीच नाही. एक तर गावापासून शाळा दूर असतात, दुर्गम भागातून येणे-जाणे कठीण असते. बाहेरच्या शिक्षकांना सक्तीने तेथे पाठवले जाते. त्यांना आदिवासींविषयी आपुलकी आणि प्रेम नसल्यामुळे आदिवासींचे शिक्षण योग्य प्रकारे होत नाही.

८. आदिवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होणे

अनेक आदिवासींना विविध आमिषे दाखवून आणि हिंदु धर्माविषयीच्या त्यांच्या अज्ञानाचा अपलाभ उठवून त्यांचे धर्मांतर केले जाते. ख्रिस्ती मिशनर्‍यांमुळे आदिवासी त्यांच्या मूळ चैतन्यदायी संस्कृतीपासून वंचित होतात. लहानपणापासूनच आदिवासींच्या मुलांना मिशनरी शाळेमध्ये ठेवून त्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते; पण या मुलांची वाढ ख्रिस्ती संस्कारांमध्ये झाल्यामुळे पुढे ते शाळा-महाविद्यालयांमधून बाहेर पडतांना ख्रिस्ती धर्मदीक्षा घेऊन जातात. तेच पुढे त्यांचे नातेवाइक आणि मित्रमंडळी यांनाही ख्रिस्ती धर्माची शिकवण देतात. गेल्या काही वर्षांत हिंदु आदिवासींचे मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीकरण झाले आहे.

९. आदिवासींसाठी झटणार्‍या संघटना

अ. ‘हिंदूंनीही आदिवासी धर्मबांधवांना समवेत घेऊन जाणे, हे स्वतःचे दायित्व आहे’, याची जाण ठेवून कार्य करणे महत्त्वाचे आहे. रा.स्व. संघाच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आदिवासींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य चालू आहे.
आ. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे आदिवासींमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन दिसून येत आहे.

१०. खर्‍या अर्थाने आदिवासींचा विकास व्हायला हवा

सरकारने आदिवासी समाजासाठी तेथे कार्य करणार्‍या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या उपाययोजनांची प्रामाणिकपणे कार्यवाही करावी, त्याचा २-३ मासांनी आढावा घ्यावा. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या द्रौपदी मुर्मू या आता राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. निदान आतातरी आदिवासींच्या योजना योग्य प्रकारे राबवून या समाजाला न्याय मिळेल का ? असा प्रश्न आदिवासी टाहो फोडून विचारत आहेत. यापुढे तरी कुठल्या आदिवासी महिलेच्या अर्भकांना हे जग डोळे भरून बघण्याआधीच गर्भाशयातून परतीचा प्रवास करायला लागू नये, हीच अपेक्षा !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, ठाणे (ऑगस्ट २०२२)