साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !
ज्ञानोबा-तुकोबा यांचा वारसा असणारा, वारकर्यांच्या दिंड्या-पताका यांनी दुमदुमणारा, भजन-कीर्तनात दंग होणारा, गणेशोत्सवात लगबगून जाणारा, प्रदीर्घ संतपरंपरेचा वारसा असणारा महाराष्ट्र साधू-संतांसाठी असुरक्षित ठरतो कि काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, नांदेड येथील घटनांनंतर नुकत्याच सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे देशात महाराष्ट्राची अपकीर्ती होत असून अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास यापुढील काळात परराज्यातील साधू-संत महाराष्ट्रापासून चार पावले दूर रहाण्याचा प्रयत्न करतील. सांगलीची घटना ही संतभूमी असलेल्या महाराष्ट्रासाठी ‘काळा डाग’ आहे.
कायदा हातात घेण्याची समाजाची घातक प्रवृत्ती !
ज्या साधूंना मारहाण केली, ते साधू वयोवृद्ध होते. त्यामुळे वयोवृद्ध साधू हे चोरी करणार्या टोळीचा भाग कसे असू शकतील, इतका सामान्य विचारही ग्रामस्थ करू शकत नाहीत का ? ग्रामस्थांना जर ‘साधू चोर असतील’, असा संशय होता, तर त्यांनी साधूंना पकडून पोलिसांच्या कह्यात का दिले नाही ? कायदा हातात घेण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? सामान्यत: हिंदूंना साधूंप्रती आदरच असतो. इथे मात्र उलटच पहायला मिळाले. त्याही पुढे जाऊन हे साधू ‘आधारकार्ड’ दाखवत असतांना ते पडताळून पहाण्याचा संयमही समाजाने का दाखवला नाही ? कोणत्याही गोष्टीची सत्यता न पडताळता स्वत:च न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन थेट शिक्षा करणे, हे एकप्रकारे अराजकतेला निमंत्रण देणारेच आहे. याचसमवेत समाजाला आज धर्मशिक्षणच नसल्याने त्यांना हिंदूंच्या देवता आणि साधू-संत यांच्याविषयी आदर वाटेनासा झाला आहे, तसेच त्यांच्यात साधू-संत ओळखण्याची क्षमताही नाही. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे.
पोलिसांची कचखाऊ भूमिका !
१३ सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली. त्या वेळी उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे पोचले होते. यानंतर साधूंनी तक्रार करण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी पुढील अन्वेषण करण्याचे कोणतेही स्वारस्य दाखवले नाही. १४ सप्टेंबर या दिवशी सकाळपर्यंत सांगलीचे पोलीस अधीक्षक ‘या संदर्भात कोणतीही तक्रार नाही. प्रसारित झालेले छायाचित्रण पाहून कारवाई करू’, असेच सांगत होते. याच कालावधीत सामाजिक माध्यमांवर ही घटना मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर आणि भाजपचे आमदार श्री. राम कदम, तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया प्रसारित झाल्यावर पोलीस यंत्रणा जागी झाली अन् त्यांनी पुढील कारवाई चालू केली. अन्य अनेक ठिकाणी त्वरित स्वत:हून कारवाई करणार्या पोलिसांनी या ठिकाणी मात्र कारवाई करण्यासाठी १ दिवसाची वाट का पाहिली ? प्रसारित झालेला ‘व्हिडिओ’ पाहून तात्काळ कारवाई का केली नाही ? यावरून पोलीस प्रशासनाची कचखाऊ आणि बोटचेपी भूमिकाच समोर येते.
साधूंचा मोठेपणा !
ग्रामस्थांनी मारहाण केल्यानंतर साधूंनी या संदर्भात तक्रार न करण्याचा जो मोठेपणा दाखवला, यावरून साधूंच्या भगव्या वस्त्राची जगाचे कल्याण करण्याची वृत्ती समोर येते. क्षमाशीलता दाखवणे हीच साधू-संत यांची प्रमुख वृत्ती असून आपल्याला मारहाण करणार्यांनाही क्षमा करण्याचा मोठेपणा केवळ संतच दाखवू शकतात.
चित्रपटसृष्टीही कारणीभूत !
साधू-संत हे चोर असतात, अशी समाजाची मानसिकता होण्यास चित्रपटसृष्टीही कारणीभूत आहे. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमधून साधू-संत हे चोर असतात, त्यांचे चारित्र्य चांगले नसते, ते महिलांवर बलात्कार करतात, महिलांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवतात, असेच चित्रण दाखवण्यात आले आहे. काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.
ज्या प्रदेशात, ज्या राष्ट्रात साधू-संत यांची अशी अवलेहना होते, साधू-संत सुरक्षित नसतात, त्याचे मोठे पाप त्या समाजाला भोगावे लागते. रामायण आणि महाभारत काळात असुर हे साधू-संतांवर अत्याचार करायचे, तर कलियुगात मोगल अन् यवन साधू-संतांवर अत्याचार करायचे. त्यामुळे साधू-संतांवर आक्रमण करून समाज नेमके कुणाचे अनुकरण करत आहे, याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
घटनेचे सखोल अन्वेषण आवश्यक !
या प्रकरणी अटक करणार्यात आलेल्यांमधील काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते, अशी चर्चा तेथील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन या घटनेमागे षड्यंत्र होते का ? हा सुनियोजित कट होता का ? मारहाण करण्यास नेमकी चिथावणी कुणी दिली ? याचेही सखोल अन्वेषण होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करणे एवढे पुरेसे नसून पालघरसह अशा अन्य सर्व प्रकरणांचे खटलेही तात्काळ चालवून आरोपींना शिक्षा होणे आवश्यक आहे, तरच असे प्रकार करण्यास कुणी धजावणार नाही !
संतभूमी महाराष्ट्रात साधू-संत यांवर वारंवार होणारी आक्रमणे, ही हिंदूंसाठी लज्जास्पद ! |