श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ
#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
इतर पंथ आणि श्राद्ध
प्रश्न : श्राद्ध करणे, हे हिंदूंनाच बंधनकारक आहे का ? पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांचा देव (गॉड) त्यांना पीडा देत नाही का ?
उत्तर : इतर सर्व उपासना संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार श्राद्ध नसले, तरी त्या मृत व्यक्तीच्या थडग्याजवळ बसून ते प्रार्थना करतात. हा श्राद्धाचाच एक प्रकार आहे.
(देव कोणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली शेकडो उदाहरणे आहेत. – संपादक)
हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करणारे शासनाचे ऑनलाईन श्राद्ध !‘अलीकडेच एका हिंदी मासिकात बातमी होती की, शासनाने हिंदूंसाठी ‘ऑनलाईन’ श्राद्धाची सोय केली आहे. ती वाचून ‘हसू का रडू’, अशी माझी स्थिती झाली. शासनाला श्राद्ध प्रत्यक्ष करण्याची कृती आहे, हे समजत कसे नाही, याचे आश्चर्य वाटले. ‘ऑनलाईन’ जेवण, विवाह होत नाहीत, तर श्राद्ध कसे होईल ? कहर म्हणजे ही सोय करणारे म्हणे हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे ! हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. श्राद्धाचे निमित्त करून हिंदूंकडून कोट्यवधी रुपये जमवण्यासाठी तर हे हिंदुप्रेम जागृत झाले नाही ना, अशी शंकेची पालही मनात चुकचुकली.’ – (प.पू.) डॉ. आठवले (१३.२.२०११) |
श्राद्धाचे महत्त्व
‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)
श्राद्धासंबंधी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ
हिंदु धर्मामध्ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितला आहे.
श्राद्ध न केल्यास कोणते दोष संभावतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.
१. ऋग्वेद
त्वमग्न ईळितो जातवेदोऽवाड्ढव्यानि सुरभीणि कृत्वी ।
प्रादाः पितृभ्यः स्वधया ते अक्षन्नद्धि त्वं देव प्रयता हवींषि ॥ – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १५, ऋचा १२
अर्थ : हे सर्वज्ञ अग्निदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्ही दिलेले हे हवनीय द्रव्य सुगंधित करून आमच्या पितरांना पोहोचव. आमचे पितर स्वधा म्हणून दिलेल्या हवनीय द्रव्याचे भक्षण करोत. हे देवा, तूसुद्धा आम्ही प्रयत्नपूर्वक अर्पण केलेल्या या हविर्भागाचे भक्षण कर.
२. कूर्मपुराण
अमावास्यादिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिताः ।
वायुभूताः प्रपश्यन्ति श्राद्धं वै पितरो नृणाम् ॥
यावदस्तमयं भानोः क्षुत्पिपासासमाकुलाः ।
ततश्चास्तङ्गते भानौ निराशादुःखसंयुताः ॥
निःश्वस्य सुचिरं यान्ति गर्हयन्तः स्ववंशजम् ।
जलेनाऽपि च न श्राद्धं शाकेनापि करोति यः ॥
अमायां पितरस्तस्य शापं दत्वा प्रयान्ति च ॥ – कूर्मपुराण
अर्थ : (मृत होऊन) वायूरूप झालेले पितर अमावास्येच्या दिवशी आपल्या वंशजांच्या घरी येऊन आपल्याला श्राद्ध वाढले जात आहे का, हेे पहातात. सूर्य मावळेपर्यंत तहान-भुकेने (अतृप्त वासनांमुळे) व्याकुळ झालेले पितर श्राद्ध न मिळाल्याने सूर्यास्त झाल्यावर निराश होतात आणि दुःखी निःश्वास टाकून स्वतःच्या वंशजांना चिरकाल दोष देतात. अशा वेळी जो पाण्याने अथवा भाजीनेही श्राद्ध वाढत नाही, त्याला अमावास्येच्या दिवशी त्याचे पितर शाप देऊन निघून जातात.
३. आदित्यपुराण
न सन्ति पितरश्चेति कृत्वा मनसि वर्तते ।
श्राद्धं न कुरुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते ॥ – आदित्यपुराण
अर्थ : मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते, असा विचार करून जो श्राद्ध करत नाही, त्याचे रक्त त्याचे पितर पितात.
४. मार्कण्डेयपुराण
श्राद्ध न केल्यामुळे प्राप्त होणारे दोष
न तत्र वीरा जायन्ते नाऽऽरोग्यं न शतायुषः ।
न च श्रेयोऽधिगच्छन्ति यत्र श्राद्धं विवर्जितम् ॥ – मार्कण्डेयपुराण
अर्थ : जेथे श्राद्ध केले जात नाही, त्या घरी मुलगा (वीराः) होत नाही (झाल्या, तर सर्व मुलीच होतात.), तेथील लोकांना आरोग्य लाभत नाही. तेथील लोकांचे आयुष्य न्यून होते (न शतायुषः), त्यांना अर्थिक अडचणी संभवतात अथवा समाधान लाभत नाही (न च श्रेयः).
(संदर्भ : श्राद्धकल्पलता, पृष्ठ ६)
या संदर्भांवरून श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.
(संदर्भ : ग्रंथाचे नाव : भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, लेखक : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, प्रकाशक : आदित्य प्रतिष्ठान, १२, अमित कॉम्प्लेक्स, ४७४ ब, सदाशिवपेठ, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक पथ) समोर, पुणे ४११०३०, दूरभाष : (०२०) ४४७९१७५,
संत एकनाथ महाराजांनी वडिलांच्या श्राद्धाचे जेवण ब्राह्मणांच्या आधी हीन जातीच्या व्यक्तींना जेवायला दिल्यामुळे त्यांना महान पुण्य मिळणे आणि त्यामुळे कुष्ठरोगी बरा होणे
संत एकनाथ महाराज पैठणला रहात होते. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. श्राद्धाच्या भोजनासाठी त्यांनी गावातील ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांच्या घरी श्राद्धासाठी स्वयंपाक करणे चालू होते. तळणाचा सुगंध त्यांच्या घराभोवती पसरला होता. रस्त्याने एक हीन जातीचा मनुष्य आपल्या लहान मुलांना घेऊन जात होता. त्या लहान मुलांना ते पक्वान्न खावेसे वाटले; म्हणून त्यांनी वडिलांजवळ ते पक्वान्न खाण्याचा हट्ट धरला. मुलांच्या वडिलांनी त्यांना सांगितले “आपण गरीब आहोत. हीन जातीचे आहोत. त्यामुळे असे पक्वान्न खाण्यास मिळणे कठीण आहे.”
संत एकनाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे ऐकले. संत एकनाथांना त्यांची दया आली. त्यांनी त्या गृहस्थाला आणि त्याच्या मुलांना घरात बोलाविले अन् त्यांना जेवायला बसविले. त्यांना पोटभर पक्वान्न खाऊ घातले. नंतर स्वयंपाकगृह आणि स्वयंपाकाची भांडी गोदावरीच्या पवित्र पाण्याने धुतली आणि पुन्हा दुसरा स्वयंपाक केला.
संत एकनाथांनी आपल्या भोजनापूर्वी हीन जातीच्या लोकांना भोजन दिले, ही गोष्ट ब्राह्माणांना समजली. त्यांना संत एकनाथांचा राग आला. एकनाथ त्यांना भोजनासाठी बोलावण्यास गेले; पण त्यांनी भोजन करण्यास नकार दिला आणि संत एकनाथांना जाती बाहेर टाकले. ब्राह्मण म्हणाले, “तुम्ही हीन जातीच्या लोकांना ब्राह्मणांच्या आधी भोजन दिले, हे पाप कृत्य केले आहे. या पापाविषयी तुम्हाला प्रायश्चित घ्यावे लागेल.”
संत एकनाथ प्रायश्चित घेण्यास सिद्ध झाले. ते गोदावरी नदीत उभे राहिले. ब्राह्मणांनी मंत्रोच्चार प्रारंभ केला. इतक्यात त्र्यंबकेश्वराहून एक ब्राह्मण आला. त्याने संत एकनाथांविषयी चौकशी केली. त्याला कुष्ठरोग झाला होता. त्याने पैठणच्या ब्राह्मणांना सांगितले, “मला कुष्ठरोग झाला आहे. मी त्र्यंबकेश्वर येथे कठोर अनुष्ठान केले. मला महादेव प्रसन्न झाले. त्यांनी मला आदेश दिला, ‘तू पैठणला जा. संत एकनाथांनी पित्याच्या श्राद्धाचे भोजन हीन जातीच्या लोकांना दिले. त्यामुळे त्यांना महान पुण्य प्राप्त झाले आहे. जर ते त्यातील थोडे पुण्य तुला देतील, तर तुझे कुष्ठ नष्ट होईल.’
त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून संत एकनाथांनी हाती पाणी घेतले आणि आपल्या पुण्यातील थोडे पुण्य ब्राह्मणाला देण्यासाठी ते पाणी त्या ब्राह्मणाच्या अंगावर टाकले. तेव्हा चमत्कार झाला. ब्राह्मणाचा कुष्ठरोग त्वरीत नष्ट झाला. पैठणातील ब्राह्मण लोकांनी हे पाहिले आणि ते एकनाथांना शरण गेले. त्यांनी एकनाथांची क्षमा मागितली आणि ते एकनाथांच्या घरी भोजन करण्यास गेले.’
– श्रीराम विश्वनाथ गुजर (मासिक शक्तीब्रह्माश्रम समाचार,(एप्रिल २०११)
(म्हणे) ‘जीवित पिता, पितामह यांचा सत्कार करणे म्हणजे श्राद्ध !’
श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण
टीका : ‘जिवंत पिता, लौकिक पितामह, प्रपितामह प्रभुतींचा सत्कार करणे हेच श्राद्ध !’ – आर्य समाजाचे संस्थापक दयानंद स्वामी
खंडण
अ. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होत असणे : ‘जीवित पिता, पितामह यांचा सत्कार म्हणजे श्राद्ध’, यासाठी स्वामी दयानंद मनूच्या ज्या श्लोकांचा संदर्भ देतात, त्यातून उलट हेच स्पष्ट केले आहे की, पिता जीवित असतांना त्याचे श्राद्ध होऊच शकत नाही. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होते.
आ. श्राद्धामुळे होणारे लाभ : पृथ्वीवर (दक्षिण दिशेला भूमी उकरून तिथे दर्भ पसरवून तीन पिंड ठेवायचे) तीन पिंड दान केले की, नरकस्थित पितरांचा उद्धार होतो. पुत्राने हरप्रयत्नाने मृत पित्याचे श्राद्ध करावे. त्यांचे नाव आणि गोत्र विधीवत् उच्चारून पिंडदानादी करण्याने त्यांना हव्य-कव्याची प्राप्ती होते. यामुळे त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण झाल्याने ते तृप्तात्मे साहजिकच त्या कुटुंबाला त्रास देत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना गती मिळून ते पुढील लोकात जातात. श्राद्ध केल्याने त्याचे परिणाम चांगले होतात, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
यामुळे आर्य समाजी दयानंद आणि आधुनिक यांचे वरील वक्तव्य चुकीचे आहे, हे दिसून येते; कारण तसे असते, तर श्राद्धात जे मोठे विधी-विधान आहे, त्याची काय आवश्यकता राहिली असती ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंबर २००८ आणि जानेवारी २००९)
श्राद्ध करण्याचे महत्त्व
१. श्राद्धासाठी तिथी
‘संन्यासी पितरांसाठी एकादशी, तसेच शस्त्रास्त्राने ज्यांचा मृत्यू आला असेल (अपघात, भूकंप, पाऊस, बाँबस्फोट, खून इत्यादी कारणाने मृत्यू आलेल्यांसाठी) त्यांच्यासाठी चतुर्दशी अशा तिथी सांगितल्या आहेत. या चतुर्दशीला ‘घायाळ चतुर्दशी’ म्हणतात.’
२. श्राद्धास योग्य तिथी
सर्वांत श्रेष्ठ आणि उत्तम श्राद्ध हे श्राद्धपक्षातील तिथींना होते. आपले पूर्वज ज्या तिथीला या जगातून गेले आहेत, त्याच तिथीला श्राद्धपक्षात केले जाणारे श्राद्ध सर्वश्रेष्ठ असते. ज्यांची दिवंगत झाल्याची तिथी लक्षात नसेल, त्यांच्या श्राद्धासाठी अमावास्येची तिथी उपयुक्त मानावी. रात्रीच्या वेळी श्राद्धकर्म निषिद्ध आहे. काशी, गया, प्रयाग, रामेश्वर इत्यादी क्षेत्रस्थानी केलेले श्राद्ध विशेष फलदायी असते.
३. श्राद्धामध्ये पिंडदान
लहान मुले आणि संन्याशी यांच्यासाठी पिंडदान केले जात नाही; कारण शरिरात त्यांची आसक्ती नसते. पिंडदान त्यांच्याचसाठी असते, ज्यांना ‘मी, माझे’ची आसक्ती असते.’
४. श्राद्धाच्या दिवशी करावयाचे पठण
श्राद्धात तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ‘शुद्धी, अक्रोध आणि अत्वरा म्हणजे घाई गडबड नको.’ श्राद्धाच्या दिवशी भगवद्गीतेमधील ७ व्या अध्यायाचे पठण करावे किंवा जमेल तितकी ज्ञानेश्वरी वाचावी. या अमृतमय पितरांना मुक्त करण्यास तीर्थ, दान, तप आणि यज्ञसुद्धा सर्वथा समर्थ नाहीत. केवळ गीतेचा ७ वा अध्यायच प्राण्यांची जरा-मृत्यू इत्यादी दूर करणारा आहे.
५. श्राद्धात श्रद्धा ठेवल्याचे लाभ
श्राद्ध कर्मामध्ये दिले गेलेले पदार्थ मंत्र तेथे पोहोचवतो, जेथे लक्षित जीव उपस्थित रहातो. श्राद्धामध्ये दिलेले अन्न पितरांची नावे, गोत्र आणि मंत्र हे त्यांच्यापर्यंत घेऊन जातात, मग ते शेकडो योनींमध्ये का गेलेले असेनात. श्राद्धाचे अन्न आदी पदार्थांमुळे त्यांची तृप्ती होते.
६. आई-वडिलांना तृप्त केले नाही, तर त्यांच्या पोटी दुःख देणारी मुले जन्माला येणे
एखाद्याच्या घरी लुळी-पांगळी किंवा आईवडिलांना दुःख देणारी मुले जन्माला आली, तर त्याचे कारणही असेच असते. ज्यांनी पितरांना तृप्त केले नाही आणि त्यांची पूजा केली नाही, आपल्या आई-वडिलांना तृप्त केले नाही, त्यांची मुलेसुद्धा त्यांना तृप्त करणारी होत नाहीत.
श्राद्धाचा एक विशेष लाभ असा आहे की, मृत्यूनंतरही जिवाचे अस्तित्व रहाते. या गोष्टीची आठवण टिकून रहाते.
७. गरुड पुराणात श्राद्धमहिमा
अमावास्येच्या दिवशी पितृगण वायूरूपात घराच्या दारासमीप उपस्थित रहातात आणि आपल्या आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. जोपर्यंत सूर्यास्त होत नाही, तोपर्यंत ते तहान-भुकेने व्याकूळ होऊन तेथेच उभे रहातात. सूर्यास्त झाल्यानंतर आपापल्या लोकी निघून जातात; म्हणून अमावास्येच्या दिवशी प्रयत्नपूर्वक श्राद्ध अवश्य केले पाहिजे.
८. पितृकार्याला विशेष महत्त्व
कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्चिन्न सीदति ।
आयुः पुत्रान् यशः स्वर्गं कीर्तिं पुष्टिं बलं श्रियम् ॥
पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात् ।
देवकार्यादपि सदा पितृकार्यं विशिष्यते ।
देवताभ्यः पितृणां हि पूर्वमाप्यायनं शुभम् ॥ – स्मृतिचन्द्रिका
अर्थ : नेहमी वेळच्या वेळी श्राद्ध करावे. तसे केल्याने कुळात कोणी दुःखी रहात नाही. पितरांची पूजा करून मनुष्य आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, ऐश्वर्य, पशूधन, सुख आणि धनधान्य प्राप्त करतो. देवकार्यापेक्षाही पितृकार्याला विशेष महत्त्व आहे. देवतांच्या आधी पितरांना महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे; म्हणून सर्व विधीत पितरांचीही पूजा केली जाते.
– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी) – (धनुर्धारी, सप्टेंबर २०१०)
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English