आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल आणि गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या !
मुंबई – शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल मुंबई पोलिसांनी जप्त केले असून त्याच्या गोळ्याही जप्त केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या वेळी शिंदे आणि शिवसेना गटांत येथील प्रभादेवी येथे हाणामारी झाली होती. या वेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी २ वेळा गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशीला प्रारंभ केला आहे.
मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले की, सरवणकर यांचे पिस्तुल ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पडताळणीसाठी पाठवले आहे. पोलिसांनी ते जप्त केले होते. पडताळणीनंतरच या पिस्तुलने गोळी झाडली होती कि नाही, हे समजेल. सरवणकर यांच्याजवळील गोळ्या अन्वेषणासाठी घेण्यात आल्या आहेत. घटनास्थळावरून एकही गोळी सापडलेली नाही.