कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ बीकेसी मैदानावर घेण्याचा निर्णय !
मुंबई – दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात राजकारण तापले असतांना अखेर शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी (वांद्रे कुर्ला संकुल) मैदानावर घेण्याचे निश्चित झाले आहे. गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ दादर येथील शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर होत असतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची १३ सप्टेंबर या दिवशी बैठक घेतली. त्यामध्ये हा मेळावा वांद्रे कुर्ला संकुल येथील मैदानावर घेण्याचा पर्याय देण्यात आला; कारण शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हा शिवतीर्थावरच होण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदे गटाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.