गांधी आणि गांधीवादी !
केरळमधील थिरूवनंतपूरम् येथील एन्.आय.एम्.एस्. रुग्णालयामध्ये तेथील दोन स्वातंत्र्यसैनिक के.ई. मेम्मन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर यांच्या स्मारकांचे अनावरण करण्यात येणार होते. त्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथन् आणि स्वर्गीय मेम्मन यांचे कुटुंबीय गांधी यांची वाट पहात होते; मात्र राहुल गांधी कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. बरं, अनुपस्थित न रहाण्याविषयी कारण देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे तेथे उपस्थित अन्य काँग्रेसवाल्यांवर लोकांनी टीका केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् आणि अन्य नेते यांनी मेम्मन आणि गोपीनाथन् यांच्या कुटुंबियांची क्षमा मागितली. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर सर्वच हतबल ! त्यामुळे चुकीची कृती करणारे राहुल गांधी यांचे कान कोण पिळणार ? न राहून शशी थरूर यांनी ‘अशा कृतीमुळे विश्वासार्हता अल्प होते’, असे विधान केले; मात्र ‘त्याचा परिणाम राहुल गांधी यांच्यावर किती झाला ?’, हा प्रश्नच आहे. ही घटना घडली आहे, ती काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या कालावधीत. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेसवाल्यांकडून बरेच प्रयत्न झाले; मात्र त्याला यश आले नाही. आताही राहुल गांधी यांच्याकडून ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी भारतभर फिरून लोकांना काँग्रेसच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जनता काँग्रेसच्या बाजूने किती प्रमाणात उभी राहील, हा संशोधनाचा विषय आहे; मात्र काँग्रेसमधील मंडळी तरी या पक्षाला साथ देतील का ? त्यात राहुल गांधी यांच्यासारखे नेते अशा घोडचुका करत राहिले, तर पक्षाचे अस्तित्व संपणे सुनिश्चित आहे. मेम्मन आणि गोपीनाथन् हे दोघेही प्रखर गांधीवादी. स्वातंत्र्यपूर्व काळात म. गांधींच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. ज्या गांधीवादाचा काँग्रेसवाले उदोउदो करतात, त्या मार्गाने मेम्मन आणि गोपीनाथन् यांनी मार्गक्रमण केले. त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून राहुल गांधी यांनी गांधीवादी आणि काँग्रेसवाले यांच्या भावना दुखावल्या.
जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे. आरंभीपासून ‘भारत जोडो’ यात्रा वादग्रस्त ठरली आहे. यात्रेच्या प्रारंभी राहुल गांधी यांनी राष्ट्रघातकी विचारसरणीचे पाद्री पोन्नियन् यांची भेट घेतली. त्यानंतर ४० सहस्रांहून अधिक किमतीचे टी-शर्ट परिधान केल्यामुळे गांधी यांच्यावर टीका झाली. या सर्वच घटनांचा अभ्यास करता ‘या यात्रेची फलनिष्पत्ती काय ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे. थोडक्यात काँग्रेसला वाचवण्याचा अशा यात्रांचा काहीही लाभ होणार नाही, हेच खरे !