ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई – कलेच्या सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या तोंडवळ्यावर हसू आणणे, हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जननाट्य संघ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (‘इप्टा’)) च्या ४९ व्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांनी वरील आवाहन केले. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
भारतीय जननाट्य संघ मागील अनेक वर्षे नाट्यस्पर्धा आयोजित करून नवीन कलाकार सिद्ध करत आहे, याचा आनंद आहे. कोणत्याही कलाकाराला त्याने सादर केलेल्या कलेतून आनंद मिळाला, तरच त्याची कला सगळ्यांपर्यंत पोचेल. हे ईश्वरी कार्य करणार्या कलाकारांचे स्थान समाजात अग्रस्थानी आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात नवीन कलाकारांनी कलेत स्वतःला वाहून घेऊन काम करावे, असे आवाहन या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केले.