सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीचे पालन करणारे सनातनचे एक आदर्श दांपत्य श्री. संतोष आणि सौ. स्नेहल गांधी !
‘मी रामनाथी आश्रमात वास्तव्यास असतांना श्री. संतोष आणि सौ. स्नेहल गांधी यांच्या शेजारी बसून सेवा करत होते. त्या वेळी माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. विचारण्याची वृत्ती असणे : सौ. गांधीकाकू बर्याच वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संरचनेची सेवा करत आहेत. असे असूनही त्या प्रत्येक वेळी गांधीकाकांना विचारूनच संरचनेची सेवा करतात.
१ आ. प्रतिक्रिया व्यक्त न करणे : काका कधी कधी थोड्या कडक आवाजात सांगतात, तरीही काकू कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता काकांनी सांगितलेली कृती करतात.
१ इ. सेवेतील अनुरूपता : काका आणि काकू १५ वर्षे एकमेकांच्या शेजारी बसून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांची जुळवणी अन् ‘अपलोडिंग’ची सेवा एकत्रितपणे करत आहेत. त्यांच्या सेवेत सहज साध्य झालेली अनुरूपता प्रत्ययास येते.
१ ई. सेवा परिपूर्ण करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानावर लावण्यासाठी एखादे विज्ञापन किंवा चौकट आयत्या वेळी आल्यावर संरचनेत पालट करावा लागतो. त्यासाठी लिखाण वर-खाली करून ते पानावर योग्य जागी लावले जाते. त्या दिवशीच्या पानाची योग्य रचना झाल्यावर व्यवहारातील एखाद्या दांपत्यास मायेतील मोलाची वस्तू मिळाल्यावर जसा आनंद होतो, तसाच किंबहुना अधिक आनंद या दोघांच्या चेहर्यावर दिसतो.
१ उ. त्याग : गेली १५ वर्षे त्यांनी आश्रमजीवन स्वीकारून सर्वस्वाचा त्याग करून दोघे गुरुचरणी आले आहेत. त्यांची मुलगीही (कु. मृण्मयी गांधी) लहानपणापासून आश्रमात असल्याने तीसुद्धा साधनेत आहे.
२. ‘विवाह संस्कारातील ४ पुरुषार्थांचे पालन करणारे सनातनचे आदर्श दांपत्य !
ते दोघे एकमेकांना साहाय्य करत चारही पुरुषार्थ यथार्थ पाळून मोक्षप्राप्तीकडे एकत्रितपणे मार्गक्रमण करत आहेत. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अध्यात्मविषयीच्या शिकवणीचे पालन करणारे ते एक आदर्श दांपत्य आहे, तसेच ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’, या ४ पुरुषार्थांचे पालन करून ते आदर्श जीवन जगत आहेत’, असे मला वाटले.
त्यांना बघून मला माझ्यातील त्रुटींची जाणीव झाली आणि मीसुद्धा त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा निश्चय केला. ‘गुरुदेवांनी मला प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’,
– सौ. वर्षा ठकार (वय ६२ वर्षे), पुणे (२४.३.२०२२)