श्राद्धविधीच्या वेळी मुंबई येथील बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती !
‘गेल्या वर्षी मालाड, मुंबई येथील आमच्या घरी महालय श्राद्ध झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्राद्धविधीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
महालय श्राद्धविधी चालू असतांना मी मध्ये मध्ये डोळे बंद करून ‘परात्पर गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवते का ?’, हे पहात होतो. तेव्हा मला आतून उत्तर आले, ‘सर्व विधी, शास्त्र आणि मंत्रोच्चार यांत मीच आहे.’ त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
२. मामीच्या पिंडावर हळद आणि कुंकू वाहिल्यावर नियोजित नसतांनाही अकस्मात् मामा घरी येणे
पिंडदान विधी चालू असतांना पुरोहितांनी आईकडील नातलगांचे पिंड मंत्रोच्चार करत सिद्ध केले. माझ्या मामीचे १ मासापूर्वी निधन झाले होते. पुरोहितांनी त्यांच्यासाठीही एक वेगळा पिंड केला. अन्य पिंडांची विधीवत् पूजा करत असतांना पुरोहितांनी मामीच्या पिंडावर हळद आणि कुंकू वहाण्यास सांगितले. मी पिंडावर हळद-कुंकू वाहिले, त्याच वेळी अकस्मात् मामा घरी आला. काही कामानिमित्त तो मुंबईत आला होता आणि प्रत्यक्ष कामाला वेळ लागणार म्हणून आमच्या घरी आला.
३. महालय श्राद्धाचा संकल्प पूर्ण झाल्याचे पुरोहितांनी सांगितल्यावर श्री गणपतीच्या छायाचित्रावरील फूल त्यांच्या पायावर पडणे आणि श्राद्धविधीमुळे पितर संतुष्ट झाल्याची प्रचीती देवाने देणे
श्राद्धविधी पूर्ण झाल्यावर पुरोहितांनी ‘प्रत्येक जण तृप्त झाला ना ?’, असे विचारले. त्यानंतर महालय श्राद्धाचा संकल्प पूर्ण झाल्याचे पुरोहितांनी सांगितले. त्या वेळी श्री गणपतीच्या छायाचित्रावरील फूल पुरोहितांच्या पायावर पडले. या माध्यमातून श्राद्धविधी योग्य प्रकारे झाल्यामुळे पितर संतुष्ट झाल्याची प्रचीती देवाने दिली.
४. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व
४ अ. ‘मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांची काळजी घेणार्या अशा सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात ईश्वराने जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : या श्राद्धविधीमध्ये आई-वडीलांकडचे, तसेच मित्र, आप्तेष्ट, गुरुवर्य आणि ज्यांचा जन्मापूर्वीच किंवा जन्मानंतर त्वरित मृत्यू झाला, अशा विविध नातलगांना पिंड दिले. ‘मृत्यूनंतरही आपल्या निकटवर्तीयांची काळजी घेणारा, त्यांना तृप्त करणारा आणि त्यांना पुढची गती देणारा’, असा हिंदु धर्म आहे. अशा सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात ईश्वराने मला जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाटली.’
– श्री. बळवंत पाठक, वडाळा, मुंबई. (११.११.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |