नगर येथील मुसलमान मुलीशी विवाह केलेल्या हिंदु तरुणाची हत्या !
दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची हिंदू संघटनांची चेतावणी
नगर – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या दीपक बर्डे या तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मुसलमान तरुणीशी विवाह केल्यानंतर एक मासानंतर या तरुणाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून मजनू शेख याचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी मजनू शेख, इम्रान शेख, समीर शेख, अजित शेख यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून या आरोपींनी दीपक बर्डे यांची हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. दोषींवर कारवाई केली नाही, तर हिंदु संघटना तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी २ दिवसांपूर्वीच अपहृत दीपक बर्डे यांच्या शोधासाठी मोर्चा काढला होता. त्यामुळे ‘लव्ह जिहादच्या सूत्रावरून अपकीर्त होणारे श्रीरामपूर यातून कधी बाहेर पडणार ?’, असा प्रश्न निर्माण होत आहे.
काय आहे प्रकरण ?
दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाचे मुसलमान मुलीशी प्रेम जुळले होते. या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी मासापूर्वी लग्न केले होते; मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणि दमदाटी करत मुलीला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे कळल्यानंतर ३० ऑगस्टला दीपकने घरच्यांना आपण मित्रासह नोकरी शोधायला पुण्याला जात असल्याचे सांगत पुणे गाठले; परंतु पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले. या मारहाणीच्या वेळी दीपकचा मृत्यू झाला. गोदावरीच्या नदीपात्रात त्याचा मृतदेह फेकण्यात आला.
मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आणि त्याच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान तरुणाने फूस लावून हिंदु तरुणीशी विवाह केल्यावर हिंदू त्याला विरोध करतात. त्या वेळी हिंदूंना ‘कट्टरतावादी’ संबोधणारे निधर्मीवादी मुसलमान युवतीशी प्रेम करून विवाह केलेल्या हिंदु तरुणाला धर्मांधांनी ठार मारल्यावर कुठल्या बिळात लपून बसतात ? |