सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा
२ सहस्रांहून अधिक धर्मबांधवांचा सहभाग
सिंधुदुर्ग – छत्रपती शिवरायांनी ‘हिंदवी स्वराज्याच्या स्थापने’ची शपथ रायरेश्वराजवळ घेतली होती. इतकेच नव्हे, तर प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आयुष्य समर्पित करून त्यांनी ‘याची देही याची डोळा’ ही प्रतिज्ञा पूर्णही केली. त्याचप्रमाणे आता हिंदूंनीही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध होणे आवश्यक आहे. या हेतूने हिंदु जनजागृती समितीने श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा आणि दोडामार्ग या तालुक्यांतील एकूण १४० हून अधिक ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांत उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. या वेळी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व विघ्ने दूर व्हावीत आणि सर्व धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होता येऊ दे’, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
या शपथविधीमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी मिळून २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला होता. या वेळी काही ठिकाणी श्री गणेशाची आरतीही भावपूर्ण करण्यात आली.