सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर त्यांनीच सूक्ष्मातून विद्युत्जनित्रामधील अडथळे दूर केल्याची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. राहुल कुलकर्णी यांना आलेली अनुभूती
१. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आरंभ होण्यापूर्वी विद्युत्जनित्र (जनरेटर) चालू न होणे आणि ते चालू करण्यासाठी सहसाधकाने बोलावल्यावर ‘मला जमणार नाही’, असा नकारात्मक विचार येणे
‘१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्यानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचे थेट प्रक्षेपण साधकांसाठी करण्यात येणार होते. प्रत्यक्ष सोहळा आरंभ होण्यापूर्वी विद्युत्जनित्र (जनरेटर) चालू होत नव्हते. काही वेळाने विद्युत्जनित्र चालू झाल्यावर ‘ते भार (लोड) घेत नाही’, असे लक्षात आल्याने सहसाधकाने मला बोलावून घेतले. तेथे जातांना माझ्या मनात ‘मला आध्यात्मिक त्रास असल्याने काही जमत नाही. मी काही करू शकत नाही’, असे नकारात्मक विचार आले. तेव्हा ‘देवच माझ्याकडून करून घेऊ शकतो’, याची मला जाणीव झाली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन तांत्रिक अडथळे दूर होण्यासाठी विद्युत्जनित्राला प्रार्थना करणे
विद्युत्जनित्राजवळ पोचल्यानंतर मी त्याचे सगळे ‘सेटिंग’ (संचजोडणी) पूर्ण बंद केले. ‘या गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाण्याची ही संधी आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. मी त्यांना प्रार्थना केली, ‘मी तुमच्या चरणी शरण आलो आहे.’ मी विद्युत्जनित्राला प्रार्थना केली, ‘हे जनित्रदेवते, विद्युत्देवते, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला गुरुचरणांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही त्याचा लाभ करून घ्या. जे अडथळे आहेत, ते दूर होऊ देत.’
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच सूक्ष्मातून विद्युत्जनित्राच्या ‘पॅनल’वरील (तावदानावरील) ‘सेटिंग’ केले’, असे जाणवणे
त्यानंतर मी विद्युत्जनित्राच्या ‘पॅनल’ (तावदान) वरील ‘सेटिंग’ (‘कीबोर्ड’वरील ‘की’च्या द्वारे) चालू केले. ते करण्याची प्रक्रिया चालू असतांना ‘मी काय करत आहे ?’, ते मला कळत होते; पण ‘का करत आहे ?’, ते मला कळत नव्हते. ‘मी ते करत नसून अन्य कुणीतरी माझ्या माध्यमातून करत आहे’, असे मला जाणवत होते. माझी ही स्थिती काही मिनिटे होती. त्या वेळी मला पुष्कळ स्थिरता जाणवत होती. त्या स्थितीतून बाहेर आल्यावर मला आनंद जाणवत होता. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच सूक्ष्मातून विद्युत्जनित्राच्या ‘पॅनल’वरील ‘सेटिंग’ केले.’
४. ‘मला आध्यात्मिक त्रास असला, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या माध्यमातून सेवा करून घेणारच आहेत. मी त्यांना शरण जायला हवे’, हे या अनुभूतीतून माझ्या लक्षात आले.’
– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२२)
|