अमरावती येथील पोलीस आयुक्तांनी ‘वसुली पथक’ नेमले ! – आमदार रवि राणा यांचा आरोप
अमरावती – येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ‘वसुली पथक’ नेमले होते. या वसुलीमुळेच शहरात गुन्हे वाढून दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. आमच्या विरोधात प्रविष्ट केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंह यांनी केलेली अवैध वसुली या संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण (‘सीआयडी’कडे) शाखेकडे अन्वेषण देण्यात आले आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे असून ध्वनीमुद्रित फीत आहे, असा दावा आमदार राणा यांनी केला. हे सगळे पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे राणा यांनी म्हटले.
रवि राणा पुढे म्हणाले की, अमरावती येथील पोलीस आयुक्त आरती सिंह या महाविकास आघाडी सरकारसाठी वसुली करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली पाठवली जात होती. आरती सिंह यांच्या विरोधातील ध्वनीमुद्रित फीत ‘सीआयडी’ला योग्य वेळी देणार आहे.
‘आरती सिंह यांनी प्रतिमासाला अमरावती येथून ७ कोटी रुपयांची वसुली केली असून त्यातील काही पैसा उद्धव ठाकरे यांना पोचवला आहे’, असा गंभीर आरोप राणा यांनी या वेळी केला.