धर्माभिमान जागृत करूया !
पुणे येथे आधी प्रदूषणाचे कारण सांगून आणि गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सुरक्षेचे कारण सांगून भाविकांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यास अटकाव करण्यात आला. भाविकांचा कल नदीत विसर्जन करण्याकडे असूनही नाईलाजास्तव कुणालाही वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती दिलेली नसल्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचेसुद्धा हौदात विसर्जन झाले, तर घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे काही प्रमाणात फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्रे, तसेच मूर्तीदान करून करण्यात आले. काही ठिकाणी हौद उपलब्ध झाले नाहीत, तसेच भाविकांना नदीजवळही जाऊ दिले गेले नाही. येथे सरकार आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दिसते. तसेच जाणीवपूर्वक हिंदूंना वहात्या पाण्यात विसर्जनाच्या त्यांच्या धार्मिक अधिकारापासून वंचित केल्याचे लक्षात येते.
विसर्जनाच्या वेळी हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांच्याकडूनही काही चुकीच्या कृती केल्या गेल्या. हिंदूंचे सण-उत्सव हे चैतन्य प्रदान करणारे, तसेच भक्तांना अनुभूती देऊन साधना करण्यास उद्युक्त करणारे असतात ! गणेशोत्सवाच्या १० दिवसांत तशी कृती किती गणेशोत्सव मंडळांकडून झाली ? ध्वनीप्रदूषणाची पातळी ओलांडून, प्रचंड मोठ्या आवाजात ‘डीजे’वर लावण्यात आलेली चित्रपटातील अश्लील गाणी, त्या तालावर थिरकणारी तरुणाई यांच्यामध्ये कुठेच श्री गणेशाप्रती भक्ती, श्रद्धा दिसत नव्हती. पुण्यातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका यंदा ३० घंटे उलटून गेले तरीही चालूच होत्या. त्यामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे, याचीही जाणीव कुणाला नव्हती.
यातून खरोखरीच भाविकांना श्री गणेशाची कृपा संपादन करता आली का ? याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने प्रशासनातील संबंधितांनाच धर्मशिक्षण नसल्यामुळे ते धर्मविरोधी कृती वारंवार करत आहेत, धर्माचरण करण्यास अटकाव करत आहेत आणि जनता त्यांचेच अंधानुकरण करत आहे. हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे