जेवणामध्ये लोणचे खाण्याचे लाभ आणि त्याची हानी !
१. प्रत्येकाच्या आहारात महत्त्वाचे स्थान असलेले लोणचे !
‘वास्तविक लोणचे ही आपल्या जेवणाच्या ताटात डाव्या हाताला वाढायची, म्हणजे अल्प प्रमाणात खायची गोष्ट समजली जाते. ज्यात ‘कोलेस्टेरॉल’ (शरिरासाठी आवश्यक असलेला अन् रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ) वाढवणारे तेल अधिक प्रमाणात असते. रक्तदाब वाढवणार्या मिठाचे प्रमाण पुष्कळ अधिक असते, तसेच पित्त वाढवणारे आंबट पदार्थ आणि मसालेही भरपूर असतात. अशा सर्व कारणांमुळे अलीकडील स्वयंघोषित आरोग्याविषयी जागरूक असलेल्या व्यक्ती लोणच्याला जेवणासह स्वयंपाकघरातही स्थान नाकारतात. वैद्य आणि आधुनिक वैद्य हेही बर्याच रुग्णांना आधी लोणचे बंद करायचा सल्ला देतात. त्यामुळे ‘इतका अपथ्यकर पदार्थ आपल्या पूर्वजांना का बरे सुचला असावा ?’, असा विचार आल्याखेरीज रहात नाही.
आता घरी विविध प्रकारची लोणची बनवायचे दिवसही गेले. मला आठवते की, माझी आई त्या त्या ऋतूतील उपलब्ध पदार्थांची लोणची घालायचीच. लोणचे घालण्यासाठी ते पदार्थ धुवा, कोरडे करा, वाळवा, कोरड्या हातांनी चिरा, बाटलीत थर लावा, प्रतिदिन हलवा ही सगळी कामे करायला आवश्यक असणारी चिकाटी मात्र हवी. वरणभात, मूग-तांदुळाची खिचडी, गोडाचा शिरा, तिखटमिठाच्या पुर्या आणि आंबोळ्या यांसमवेत पूर्वी ‘सॉस’ नव्हे, तर लोणचे असायचे. पुष्कळ भूक लागली असेल, तर लोणचे पोळीही खाल्ली जायची. प्रश्न असा आहे की, समस्त आधुनिक वैद्यांनी निक्षून नाकारलेल्या या पदार्थाला आपल्या आहारात खरेच काही स्थान आहे का ? असल्यास किती ? तो सर्वदा अपथ्यकर पदार्थ आहे का ? या पदार्थाविषयी आयुर्वेदाची नेमकी काय भूमिका आहे ? ते जाणून घेऊ.
२. लोणच्यातील आम्ल आणि लवण हे दोन्ही रस जठराग्नी वाढवणारे असल्याने पचनाला साहाय्यक होणे
लोणच्यात सामान्यतः आंबट आणि खारट या २ मुख्य चवी असतात. आंबट चवीच्या पदार्थांमध्ये भरपूर मीठ घालून लोणचे बनवले जाते. मिरची, हळद आणि मेथी अशा वेगळ्या चवींच्या पदार्थांची लोणची केली, तरी त्यात लिंबू पिळून आंबट चव राखली जाते. आम्ल आणि लवण (आम्लाची क्षारासह झालेल्या विरुद्ध क्रियेतून तयार होणारा पदार्थ) या दोन रसांमुळे लोणचे स्वादिष्ट असते अन् इतर पदार्थांनाही वेगळी चव द्यायला समर्थ असते. आजारात वरणभात बेचव लागतो; पण त्यासमवेत लोणच्याची फोड आली की, रुग्णाला चार घास अधिकचे जातात. आम्ल आणि लवण हे दोन्ही रस जठराग्नी वाढवणारे आहेत. त्यामुळे ते पचनाला साहाय्य करतात आणि भूकही वाढवतात, तसेच हे दोन्ही रस (चवी) अत्यंत वातशामक आहेत. पोटात साठलेल्या वाताला योग्य मार्गाने बाहेर काढायला ते साहाय्य करतात. त्याचप्रमाणे शरिरातील वातदोषावर ते नियंत्रण ठेवतात.
तेल हा लोणच्यामधील तिसरा मुख्य घटक. लोणचे टिकावे; म्हणून त्यात भरपूर तेल घालतात. लोणच्यावर किमान अर्धा इंच जाडीचा तेलाचा तवंग ठेवला जातो. यासाठी वापरले जाणारे तिळाचे किंवा शेंगदाण्याचे तेल हे अत्यंत वातशामक असते. किंबहुना तेलाला वातदोषाचे सगळ्यात ‘श्रेष्ठ औषध’ म्हटले आहे.
लोणच्यात घातले जाणारे इतर मसाले, तिखट, बडीशेप आणि मेथीचे दाणे हे पदार्थ पाचक अन् अग्नीवर्धक आहेत. साकल्याने विचार करता लोणचे हा पदार्थ स्वादिष्ट, अरुची नष्ट करणारा, अग्नीवर्धक, पाचक आणि अत्यंत वातशामक आहे. अर्थात्च या सगळ्या गुणांची आवश्यकता असतांना हा पदार्थ भोजनात समाविष्ट करायला काहीच हरकत नाही.
३. पावसाळ्यात होणार्या अतिशय आणि क्लिष्ट वातप्रकोपावर लोणचे हा उत्तम उपाय असणे
लोणच्याच्या या सगळ्या गुणांची आपल्याला आवश्यकता भासते ती पावसाळ्यात ! या काळात हवेत बाष्प मोठ्या प्रमाणावर असल्याने स्वतःचा जठराग्नी अत्यंत मंद झालेला असतो. भूक आणि पचन दोन्ही मंदावलेले असते. पावसाळ्याच्या पूर्वी येऊन गेलेल्या ग्रीष्म ऋतूतील रुक्षतेमुळे शरिरात वातदोषाचे बस्तान बसायला आरंभ झालेला असते. पावसाळ्यात पाऊस पडला की, हवेत गारवा येतो. या शीत गुणाचे साहाय्य मिळाले की, शरिरातील वातदोष वाढतो आणि व्याधी निर्माण करायला आरंभ करतो. सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी, पोटात गुडगुड, हातापायाला मुंग्या आणि बद्धकोष्ठता असे वाताचे आजार याच काळात डोके वर काढतात. अशा वेळी या वाढलेल्या वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘लोणचे’ उपयोगी पडते. ‘व्यक्त अम्ल लवण स्नेह म्हणजे आंबट, खारट आणि तेलयुक्त पदार्थ’, असे याचे वर्णन शास्त्रात केले आहे. खरेतर पावसाळ्यानंतर पुढे शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होऊन तो त्रासदायक ठरतो. पावसाळ्यात पित्त शरिरात साठायला आरंभ होतो. तरीही त्या पित्ताला अनुकूल असे लोणचे पावसाळ्यात खाण्याचा सल्ला आचार्य (वैद्य) देतात; कारण पावसाळ्यात होणार्या अतिशय आणि क्लिष्ट वातप्रकोपावर तोच उत्तम उपाय आहे, असे त्यांचे मत आहे.
४. लोणचे खातांना घ्यावयाची काळजी !
‘ऊस गोड लागला म्हणून मुळासह खाऊ नये’, अशी एक सार्थ म्हण आपल्याकडे आहे. ती लोणच्यालाही लागू होते. लेखात आधीच वर्णन केल्याप्रमाणे लोणचे हा पदार्थ जेवणाच्या ताटात डावीकडे वाढायचा, म्हणजे छोट्या चमच्याने एकदाच वाढायचा पदार्थ आहे. काही लोक भाजी इतक्या प्रमाणात लोणचे खातात. ते चूक आहे. अंगठ्याच्या पेराएवढी फोड आणि अर्धा चमचा खार इतके लोणचे एका दिवसाला पुरे !
लोणचे अधिक सेवन केले, तर केस लवकर पांढरे होतात, गळतात आणि लहान वयात टक्कल पडते. सांधे शिथिल किंवा दुर्बल होतात. रक्तदुष्टी होऊन (रक्ताचे संतुलन बिघडून) त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे असे काही आजार असतांना मात्र लोणचे न खाणेच इष्ट !
५. बाजारातील लोणचे आरोग्याला बाधक असल्याने घरी बनवलेल्या लोणच्याला प्राधान्य देणे
बाजारात मिळणार्या लोणच्यामध्ये मूळ पदार्थ (कैरी, लिंबू आणि आवळा) हे किती स्वच्छ वापरले जातात ? ते ठाऊक नाही. लोणच्याची चव आणि त्याच्या टिकण्याचा काळ वाढावा; म्हणून त्यात ‘व्हिनेगर’ वापरले जाते. इतका कृत्रिम आंबटपणा आपल्याला यात अपेक्षित नाही, तसेच टिकाऊपणासाठी त्यात मोठ्या प्रमाणात रसायनेही टाकली जातात. सरकी किंवा पाम तेल या स्वस्त तेलांचा वापर बाजारू लोणच्यामध्ये केला जातो. ही दोन्ही तेले आपल्यासाठी अपथ्यकर आहेत. त्यामुळे लोणचे खायचे असेल, तर ते घरी करूनच खावे.
६. लोणच्यामध्ये खडे मीठ किंवा सैंधव आणि तीळ तेल वापरण्याचे महत्त्व
त्वचेचे आजार, रक्तदाब, डोळ्यांचे आजार आणि चष्मा असलेल्या व्यक्तींना मीठ चालत नाही. पावसाळ्यात त्यांनाही कधीतरी लोणचे खावेसे वाटू शकते. अशा व्यक्तींसाठी लोणच्यात पांढर्या मिठाऐवजी खडे मीठ किंवा सैंधव वापरावे, तसेच तिळाचे तेल, हेच वातदोषावर श्रेष्ठ औषध असल्याने घरी लोणचे करतांना त्याचाच उपयोग करण्याचा कटाक्ष असावा.
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २१.७.२०१९)