कणकवली (सिंधुदुर्ग) येथे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता !
श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी गणपति साना येथे केले गंगापूजन
कणकवली – वैश्य समाजाचे गुरु तथा हळदीपूर येथील शांताश्रम मठाधीपती श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांच्या उपस्थितीत गेले २ मास येथे चालू असलेल्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची शहरातील गणपति साना येथे गंगापूजनाने सांगता झाली. या वेळी श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी विशेष नौकेतून जानवली नदीच्या पात्रात जाऊन गंगापूजन केले. त्यानंतर सजवलेल्या रथातून श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची कणकवली बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध कार्यक्रमांनी हा चातुर्मास सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागांतूनही वैश्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांनी या सोहळ्याच्या कालावधीत हिंदु जनजागृती समितीला राष्ट्र आणि धर्म यांविषयी विविध विषय मांडण्यास अनुमती दिली होती.
श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञाश्री श्री वामनश्रम स्वामी यांनी त्यांच्या या चातुर्मास सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीला राष्ट्र आणि धर्म यांविषयक प्रबोधन करण्यासाठी अनुमती दिली होती. या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर या दिवशी सोहळ्याच्या सांगतेच्या वेळी श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या अनुमतीने ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि हिंदूंवरील आघात’, हा विषय मांडण्यात आला. कु. दिव्या शिंत्रे यांनी हा विषय मांडला, तसेच त्यानंतर उपस्थितांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली. कु. नीना कोळसुलकर यांनी सर्वांना प्रतिज्ञा सांगितली. |
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. श्री श्री वामनाश्रम स्वामी हिंदु राष्ट्राच्या प्रतिज्ञेसाठी स्वतः उभे राहिले.
२. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि हिंदूंवरील आघात’, हा विषय चालू असतांना सभागृहाच्या आजूबाजूला असलेले लोक विषय ऐकण्यासाठी व्यासपिठाच्या समोर आले, तसेच सभागृहाच्या बाजूने उभे राहून विषय एकाग्रतेने ऐकत होते.
३. स्वामींच्या मार्गदर्शनाची वेळ होऊनही हिंदु जनजागृती समितीला त्यांचा विषय मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला.
४. वैभववाडीचे श्री. संतोष टक्के यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची स्वतःहून येथे भेट घेतली आणि ‘लव्ह जिहाद’ विषय अधिकाधिक लोकांपर्यत पोचला पाहिजे’, असे सांगितले.
५. डॉ. पावसकर (हरकुळ), विविध शाळांचे शिक्षक, सरपंच, तसेच काही उपस्थित यांनी वैयक्तिकरित्या कार्यकर्त्यांना भेटून ‘विषय आवडला ! राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात समाजापर्यंत पोचले पाहिजेत’, असे सांगितले.
६. धर्मप्रेमी श्री. संजय शिरसाट यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य ठाऊक होते; पण आजचा विषय ऐकून याविषयी मलाही ‘समाजात प्रबोधन केले पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे’, याची तीव्रतेने जाणीव झाली, असे सांगितले.
७. या वेळी वैश्य बांधव आणि धर्माभिमानी मिळून ५०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती.
८. या सेवेत हिंदु जनजागृती समितीच्या कु. दिव्या शिंत्रे, कु. नीना कोळसुलकर, सौ. भारती सावंत, श्री. सूर्यकांत मालवणकर आणि श्री. विजय शिंत्रे सहभागी झाले होते.