पैठण येथील सभेसाठी मुख्यमंत्र्यांवर गर्दी जमवण्याची वेळ हे महाराष्ट्राचे दुर्दैव ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते
मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे जाहीर सभा होणार असून त्यात तालुक्यातील अंगणवाडीसेविकांना उपस्थित रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे राज्यात प्रथमच घडत आहे. आज अंगणवाडीसेविका सभेसाठी गेल्या, तर त्या अंगणवाडीतील मुलांनी काय करायचे ? गर्दी जमवण्यासाठी जर ही परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे गंभीरतेने घेतले पाहिजे. अनुमतीविना कुणीही परस्पर असे आदेश काढत नाही, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १२ सप्टेंबर या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
देहली येथील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतःहून बोलणे टाळल्याचे प्रतिपादन !
अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘देहली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मी प्रसाधनगृहात (‘वॉशरूम’ला) गेलो होतो. त्या वेळी अजित पवार उठून बाहेर गेल्याची चर्चा रंगू लागली. मी राष्ट्रीय पातळीवर जातो, उपस्थित रहातो; पण मी मार्गदर्शन करत नाही. वेळेअभावी मला राष्ट्रीय अधिवेशनात बोलता आले नाही. मी अप्रसन्न नसून मला बोलण्यापासून कुणी अडवले नाही. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रांताध्यक्ष यांनी बोलणे अपेक्षित असते. त्यामुळे मी तिथे बोलणे टाळले; परंतु माध्यमांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. वास्तविक मला तिथे ‘कुणी बोलू नका’, असे कुणीही सांगितले नाही. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही, असे नाही, अनेक नेते बोलले नाहीत. प्रसारमाध्यमांनी वस्तूनिष्ठ वार्तांकन करावे.’’