लंपी आजारापासून पशूधन वाचवण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – पशूधन ही आपली संपत्ती असून तिची जपणूक करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात लंपी त्वचारोगाने पशूंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ सप्टेंबर या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिले. पशूसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजाराच्या संदर्भात माहिती दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशूवैद्यकीय अधिकार्यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे, असेही सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,…
१. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश आणि महिष वर्गातील जनावरांना लंपी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी पशूधन दगावण्याचे प्रमाण अल्प आहे. पशूपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास स्वत:च्या जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचवता येईल.
२. पशूसंवर्धन विभागाने पशूपालकांमध्ये जनजागृती करावी, तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी. बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील, याची काळजी घ्यावी. यासाठी संबंधित पशूसंवर्धन अधिकार्यांनी आपल्या भागात पशूपालकांच्या साहाय्यासाठी उपलब्ध रहावे.
३. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर साहाय्यासाठी पशूपालकांनी पशूवैद्यकीय चिकित्सालयात संपर्क करावा अथवा विभागाचा ‘टोल फ्री’ क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय ‘कॉल सेंटर’मधील ‘टोल फ्री’ क्रमांक १९६२ वर संपर्क करावा.