तुर्कीयेने त्याचे विनाशकारी ड्रोन पाकला विकले !
भारताला ड्रोन विकणार नसल्याची फुशारकी !
अंकारा (तुर्कीये) – भारताचा नेहमीच द्वेष करत आलेल्या तुर्कीयेने त्याचे ‘टीबी २’ हे विनाशकारी ड्रोन पाकिस्तानला विकले आहे. या ड्रोनची (मानवविरहित हवाई यंत्राची) निर्मिती करणार्या आस्थापनाचे प्रमुख हलुक बेराकटार यांनी ही घोषणा केली. ‘हे ड्रोन केवळ तुर्कीयेचे मित्र राष्ट्र पाकिस्तान, अझरबैजान आणि युक्रेन यांसारख्या राष्ट्रांना विकण्यात येत आहेत’, असे बेराकटार म्हणाले. बेराकटार हे तुर्कीयेचे राष्ट्रपती तैय्यप एरदोगान यांचे जावई आहेत. त्यांना तुर्कीयेमध्ये ‘ड्रोनचे जनक’ म्हटले जाते. त्यांच्या आस्थापनाने बनवलेल्या ड्रोन्सची अनेक देशांत मागणी आहे.
१. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही हे ड्रोन भारताला विकणार का ? त्यावर बेराकटार म्हणाले, ‘‘युद्धातून कमाई करण्याचे आमच्या आस्थापनाचे धोरण आहे. एका संघर्षात गुंतलेल्या दोन्ही राष्ट्रांना आम्ही ड्रोन विकत नाही. तुर्कीयेशी मैत्री असलेल्या राष्ट्रांना आम्ही आमचे ड्रोन्स विकतो. आमचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत.’’ (असल्या देशाकडे भारत ड्रोनची मागणी का करील ? भारताकडे अनेक विनाशकारी शस्त्रास्त्रे असल्यामुळे भारताला तुर्कीयेच्या ड्रोन्सची आवश्यकता नाही ! – संपादक)
२. मुलाखतीत बेराकटार यांनी दावा केला की, ‘टीबी २’सारखे ड्रोन हे भूमीवरील युद्धासमवेतच नौदलाच्या युद्धातही प्रभावी आहेत. शस्त्रास्त्रे वाहून नेणारे ड्रोन भविष्यात होणार्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. ड्रोन विमानांखेरीज भविष्यातील युद्धे लढली जाणार नाहीत. तसेच जी राष्ट्रे ‘ड्रोन्स’चे तंत्रज्ञान विकसित करणार नाहीत, त्यांची स्थिती बिकट होणार आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीरला स्वतंत्र करण्याची भारतद्वेषी मागणी करणार्या पाकधार्जिण्या तुर्कीयेकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? |