श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता
#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींच्या कह्यात जाऊन त्यांचे गुलाम झाल्याने अनिष्ट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धविधीमुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात श्राद्धविधीविषयीची तोंडओळख आणि त्याचा इतिहास आपण पाहिला. आज श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता यांविषयी जाणून घेऊया.
१. ‘देव, ऋषि आणि समाज या तीन ऋणांसमवेतच पितृऋण फेडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते.
२. श्राद्धादी कुलधर्म पाळल्यावरच वंशशुद्धी होणे, अन्यथा वंशविध्वंस होणे अटळ !
‘गर्भधारणा झाली की, त्या अर्भकाचा जन्म सुखाने व्हायचा असतो. गर्भात जिवाचा प्रवेश, त्याची वाढ, गर्भवती मातेची प्रसन्नता आणि सहजसुलभ प्रसुती हे का केवळ औषधाने होते ? त्याकरिता ईश्वरीकृपा हवी. विश्व निर्माण करणार्या शक्तीची कृपा हवी. पितर हे वंशरक्षक आहेत; म्हणून शाश्वत असे कुलधर्म, श्राद्धादी धर्म कटाक्षाने सांभाळावे लागतात. कुलधर्म टळले, मातृदोष आणि पितृदोष वाढले, तर त्या कुटुंबाचा विध्वंस होतो. श्राद्धादी कुलधर्म सांभाळले की, वंशशुद्धी अटळ असते. त्याकरिता शाश्वत असे कुलधर्म, श्राद्धादी धर्म पाळले पाहिजेत.’
३. ‘पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड आणि उदक) दिल्यावरचसुखी अन् संतुष्ट होतात. ‘पुत्र कुणाला म्हणावे’, याविषयी शास्त्रवचन पुढे दिले आहे –
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयम्भुवा ॥ – मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक १३८
अर्थ : मुलगा हा आपल्या पितरांचे ‘पुं’ नामक नरकापासून रक्षण करतो; म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच ‘पुत्र’ म्हटले आहे.
यानुसार पितरांना सद्गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी आणि पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, यांसाठी पुत्राने श्राद्ध करावे. पुत्र म्हणवणार्यांचे ते कर्तव्यच आहे, हे यातून स्पष्ट होते.
४. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । – तैत्तिरीयोपनिषद् १, अनुवाक ११, वाक्य २
अर्थ : देवकार्य आणि पितृकार्य यांत कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.
५. श्राद्धविधी न करणार्यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे.
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ४२
अर्थ : अशांचे (श्राद्धविधी न करणार्यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय होत नाही.’
६. ‘सुमंतुऋषी सांगतात, ‘श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करमुदाहृतम् ।’, म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कधी टाळू नये.’
७. ‘ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, ‘देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.’
८. ‘ब्रह्मपुराण सांगते, ‘जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्त करते. श्राद्ध करणार्याच्या कुळात कुणी दुःखी रहात नाही.’
९. ‘एखाद्या मृत व्यक्तीची ‘आपले श्राद्ध व्हावे’, अशी इच्छा असली आणि अपेक्षितांकडून ती पूर्ण झाली नाही, तर वासना-अतृप्तीचे दुःख त्याला होते. असा एखादा मृतात्मा श्राद्ध न केल्याचा राग नातेवाइकांवर काढण्याची शक्यता असते. काही वेळा मृतात्मा नातेवाइकाला पुढील उदाहरणानुसार त्रास देतात –
एकदा एका माणसाच्या अंगात आले आणि तो उड्या मारू लागला. नगरच्या प.पू. क्षीरसागर महाराजांनी विचारले, ‘आपण कोण ?’ त्याने उत्तर दिले, ‘मी या व्यक्तीचा वडील आहे.’ महाराजांनी विचारले, ‘आपण का आलात ?’ अंगात आलेल्या वडिलांनी सांगितले, ‘हा मला जेऊ घालत नाही, श्राद्ध करत नाही. मी उपाशी आहे.’
१०. एखाद्याला, ‘श्राद्धामध्ये काही अर्थ नाही; म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको’, असे वाटत असेल आणि मृत्यूनंतर श्राद्ध न केल्याने, ‘आपण अडकलो आहोत’, अशी जाणीव झाली; तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दुःखी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.
११. एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण संबंध श्राद्ध केल्याने पूर्ण होतो, उदा. आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला, तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे.
१२. श्राद्ध केल्याने पितरांना गती मिळते, तरी ते सातत्याने करणे आवश्यक
मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे ते अन्न त्याच्या सूक्ष्म-देहाला वर्षभर पुरते. जोपर्यंत इच्छा-आकांक्षा असतात, तोपर्यंत ती मृत व्यक्ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवते. श्राद्ध केल्याने त्यांची इच्छापूर्ती तर होतेच, तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. पूर्वजांची एखादी जरी वासना तीव्र असली, तरी श्राद्धविधींद्वारे मिळणारी ऊर्जा त्यांच्या वासनापूर्तीसाठीच वापरली गेल्याने पितरांना पुढे जाण्यास गती मिळत नाही. त्यामुळे सातत्याने श्राद्ध केल्याने हळूहळू त्यांची वासना न्यून होत जाऊन ते गतीस प्राप्त होऊ शकतात. तसेच शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक वर्षी श्राद्ध करणे, हेच योग्य आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English